न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाच्या सलामी जोडीसाठी भारतीय संघाचे माजी गोलंदाज अजित आगरकर यांनी लोकेश राहुल आणि मुरली विजय यांना पसंती दिली आहे. न्यूझीलंड विरुद्ध भारत तीन कसोटी सामने खेळणार असून, येत्या २२ सप्टेंबर रोजी कानपूर येथे पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. ‘ईएसपीएन’शी बोलत असताना आगरकर म्हणाले की, शिखर धवनने आजवर अनेकदा भारतीय डावाची सुरूवात केली आहे, आता नवीन फलंदाजांना संधी द्यायला हवी. लोकेश राहुल आणि मुरली विजय यांनी स्वत:ला सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे त्यांना नक्कीच फलंदाजी क्रमवारीत अग्रस्थानी पाठवण्यास हरकत नाही. लोकेश राहुल आणि मुरली विजय हे सलामीसाठी उत्तम पर्याय आहेत.
वाचा: ..हे पाच विक्रम भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेत मोडीत निघू शकतात
रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांच्या निवडीबाबत देखील आगरकर यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, ज्या खेळाडूंची निवड होईल तेच खेळाडू तिनही सामन्यात पाहायला मिळतील अशी आशा आहे. सर्वोत्तम संघ तिनही सामन्यात कायम राखण्यावर भर देण्याची गरज आहे. केवळ एखाद्या सामन्यात संधी मिळाल्याने खेळाडूवर त्याच्यातील कौशल्य दाखविण्याचा दबाव असतो. अशावेळी त्या खेळाडूकडून चांगली कामगिरी होईलच असे नाही. संघातील खेळाडू कोणत्याही दबावाखाली खेळणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. त्यामुळे तिनही सामन्यात संघ कायम असायला हवा, असेही आगरकर पुढे म्हणाले.
वाचा: ‘निवड समितीवर काम करताना मित्र दुरावतात’
आता २२ सप्टेंबर रोजी भारतीय संघ पाच गोलंदाजांसह मैदानात उतरण्यास पसंती देणार की कोणतीही जोखीम न पत्करता सात फलंदाजांसह मैदानात उतरणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. बीसीसीआयच्या निवड समितीकडून सोमवारी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाच्या संभाव्य १५ खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली. विराट कोहली भारतीय संघाचे नेतृत्त्व करणार असून, अजिंक्य रहाणे संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे.
वाचा: संदीप पाटील म्हणतात, रोहित शर्माला कसोटीमध्ये पुरेशी संधी मिळालीच नाही