Australia vs Afghanistan, Glenn Maxwell 201 Knock: मंगळवारी (७ नोव्हेंबर) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात एक रोमांचक सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने ३ गडी राखून विजय मिळवला. या विजयात सर्वात मोठा वाटा होता ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलचा, ज्याने बॉल आणि बॅट दोन्हीत चमकदार कामगिरी केली.या सामन्यात मॅक्सवेलने एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठी खेळी खेळली. यानंतर आता टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आकाश चोप्राने मॅक्सवेलच्या कामगिरीबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.
मॅक्सवेल पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाची स्थिती या सामन्यात खूपच वाईट होती. एका टोकाकडून सातत्याने विकेट्स जात असताना दुसऱ्या टोकाला उपस्थित असलेल्या मॅक्सवेलने तुफानी खेळी करत द्विशतक झळकावले. ही खेळी पाहिल्यानंतर आता संपूर्ण क्रिकेट जगतात त्याचे कौतुक होत आहे.
आकाश चोप्राकडून ग्लेन मॅक्सवेलचे जोरदार कौतुक –
या एपिसोडमध्ये टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आकाश चोप्राने मॅक्सवेलच्या कामगिरीचा विचार करून मोठे वक्तव्य केले आहे. आकाश चोप्राने २०२३ च्या विश्वचषकातील अफगाणिस्तानविरुद्ध ग्लेन मॅक्सवेलने झळकावलेल्या द्विशतकाला त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम एकदिवसीय खेळी असल्याचे म्हटले आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आकाश चोप्रा म्हणाला, “आम्ही काय पाहिले? हे अविश्वसनीय, अविश्वसनीय आणि अद्वितीय होते. मी मजा करत नाही, ही आतापर्यंतची सर्वोत्तम एकदिवसीय खेळी आहे. मी फक्त विश्वचषकाबद्दल बोलत नाही. ग्लेन मॅक्सवेलने वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी खेळली आहे.”
एकदिवसीय धावसंख्येचा पाठलाग करताना त्याच्याकडून दुहेरी शतक झळकावण्याची अपेक्षा नव्हती, असे भारताच्या माजी सलामीवीराने नमूद केले. तो म्हणाला, “एकदिवसीय धावसंख्येचा पाठलाग करताना द्विशतक होणार नाही याची मला जवळजवळ खात्री होती. ते करण्याची संधी कुठे मिळते? हे तेव्हा शक्य होते, जेव्हा आपण ३५०-३७५ धावांचा पाठलाग करत असतो. असताना हे फक्त दुसऱ्या डावात होऊ शकते आणि अशा परिस्थितीत द्विशतके झळकावली जात नाहीत.”
सामन्याबद्दल बोलायचे, तर एकदिवसीय विश्वचषक २०२३ च्या ३९ व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा तीन गडी राखून पराभव केला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने ५० षटकांत ५ गडी गमावून २९१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४६.५ षटकांत सात विकेट गमावत २९१ धावा केल्या आणि सामना जिंकला. या विजयासह कांगारू संघाने उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरी गाठणारा ऑस्ट्रेलिया हा तिसरा संघ ठरला आहे. आता चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत होणार आहे.