कोलकाता : यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशन आणि वेगवान गोलंदाज आकाश दीप दुखापतींमधून अद्याप पूर्णपणे न सावरल्याने त्यांना आगामी दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेला मुकावे लागणार आहे. किशनच्या अनुपस्थितीत बंगालचा अनुभवी सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन पूर्व विभाग संघाचे नेतृत्व करेल. दुलीप करंडक स्पर्धेला २८ ऑगस्टपासून प्रारंभ होणार असून नव्या देशांतर्गत क्रिकेट हंगामाची ही सुरुवात ठरेल. या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पूर्व विभागासमोर उत्तर विभागाचे आव्हान असेल.
या सामन्यात किशन आणि आकाश दीप खेळू शकणार नाहीत. आकाश दीप पाठीच्या दुखापतीतून सावरलेला नाही. याच दुखापतीमुळे त्याला नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यातील दोन कसोटी सामन्यांना मुकावे लागले होते. त्याच्या जागी बिहारच्या २८ वर्षीय मुख्तार हुसेनला पूर्व विभागाच्या संघात संधी देण्यात आली आहे. आकाश सध्या बंगळूरु येथील ‘बीसीसीआय’च्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ येथे दुखापतीवर उपचार घेत आहे. तो वेस्ट इंडिजविरुद्ध २ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी उपलब्ध असणे अपेक्षित आहे. आकाशने इंग्लंडविरुद्ध बर्मिंगहॅम येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत १० बळी मिळविण्याची कामगिरी केली होती.
दुसरीकडे, इशान किशनच्या हाताला दुखापत आहे. ‘‘काही दिवसांपूर्वी बाईकवरून पडल्याने इशानच्या हातावर काही टाके पडले आणि तो सध्या बंगळूरुमधील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’मध्ये आहे. त्याची दुखापत गंभीर नाही, पण खबरदारी म्हणून त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. तो पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया-अ संघाविरुद्ध दोन चारदिवसीय सामने खेळणे अपेक्षित आहे,’’ असे किशनच्या जवळील व्यक्तींकडून सांगण्यात आले.
आता ईश्वरनकडे नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग होता, पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. आसामचा अष्टपैलू रियान पराग उपकर्णधारपद भूषवेल. किशनच्या जागी ओडिशाच्या आशीर्वाद स्वेनला संघात स्थान देण्यात आले आहे. पूर्व विभाग संघ : अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), रियान पराग (उपकर्णधार), कुमार कुशाग्र, आशीर्वाद स्वेन (दोघे यष्टिरक्षक), संदीप पटनायक, विराट सिंह, डेनिश दास, श्रीदम पॉल, शरणदीप सिंग, उत्कर्ष सिंह, मनिशी, सूरज सिंधू जैस्वाल, मुकेश कुमार, मुख्तार हुसैन, मोहम्मद शमी.