India vs England, Akash Deep Pull Shot: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाचा पहिला डाव २२४ धावांवर आटोपला. तर इंग्लंडने पहिल्या डावात फलंदाजी करताना २४७ धावा करत २३ धावांची आघाडी घेतली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून यशस्वी जैस्वाल आणि आकाशदीप यांनी महत्वपूर्ण भागीदारी केली. यशस्वी जैस्वालने आपलं शतक पूर्ण केलं. तर नाईट वॉचमन म्हणून आलेल्या आकाशदीपने दमदार अर्धशतकी खेळी केली.

पहिल्या दिवशी फलंदाजी करताना भारतीय संघाला सुरुवातीलाच २ मोठे धक्के बसले होते. केएल राहुल आणि साई सुदर्शन लवकर बाद होऊन माघारी परतले होते. त्यामुळे नाईट वॉचमन म्हणून आकाशदीपला फलंदाजीला यावं लागलं. सामन्यातील दुसऱ्या दिवशी त्याने काही चेंडू खेळून काढले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याच्या फलंदाजीचा जलवा पाहायला मिळाला. त्याने यशस्वी जैस्वालसोबत मिळून १०७ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. आकाशदीपने ९४ चेंडूंचा सामना करत १२ चौकारांच्या साहाय्याने ६६ धावांची खेळी केली.

आकाशदीपचा पुल शॉट

भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा हा आपल्या पुल शॉटसाठी ओळखला जातो. गोलंदाजाने बाऊंसर किंवा शॉर्ट चेंडू टाकला की तो रोहितच्या बॅटला लागून थेट स्टँड्समध्ये जातो. ओव्हलच्या मैदानावर तिसऱ्या दिवसाचा खेळ पाहण्यासाठी रोहित शर्माने देखील हजेरी लावली आहे. ज्यावेळी आकाशदीप फलंदाजी करत होता, त्यावेळी रोहित शर्मा स्टँड्समधून त्याची फलंदाजी पाहत होता.

तर झाले असे की, भारतीय संघाची फलंदाजी सुरू असताना इंग्लंडकडून ३४ वे षटक टाकण्यासाठी गस एटकिंसन गोलंदाजीला आला. या षटकातील पहिलाच चेंडू एटकिंसनने शॉर्ट टाकला. या चेंडूवर आकाशदीपने दमदार पुल शॉट मारला. या शॉटवर त्याने ४ धावा वसूल गेल्या. ज्यावेळी त्याने हा शॉट मारला, त्यावेळी आकाशदीप ३३ धावांवर फलंदाजी करत होता.

यशस्वी जैस्वालचं दमदार शतक

डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल या जोडीला हवी तशी सुरूवात करता आली नव्हती. केएल राहुल स्वस्तात माघारी परतला. मात्र यशस्वी जैस्वालने एक बाजू धरून ठेवली होती. त्याने आकाशदीप सोबत मिळून दमदार शतकी भागीदारी केली. त्यानंतर त्याने १३२ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं. या मालिकेतील हे त्याचं दुसरं शतक ठरलं आहे.