Akash Deep Uncomfortable Send Off to Ben Duckett Video: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ओव्हल कसोटीत भारतीय संघ पहिल्या डावात २२४ धावा करत सर्वबाद झाला. यानंतर इंग्लंडच्या सलामीवीरांनी वादळी फटकेबाजी करत भारताच्या गोलंदाजांना घाम फोडला. बेन डकेट आणि जॅक क्रॉलीने गोलंदाजीसाठी अनुकूल असणाऱ्या खेळपट्टीवर भारताच्या गोलंदाजीविरूद्ध चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. पण आकाशदीपने मात्र संघाला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला. यानंतर आकाशने डकेटला दिलेला सेंडऑफ सध्या व्हायरल होतोय.
भारतीय संघ दुसऱ्या दिवशी अवघ्या अर्ध्या तासात सर्वबाद झाला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी कमाल गोलंदाजी करत टीम इंडियाला फार वेळ मैदानात टिकू दिलं नाही. ६ धावांत भारताने ४ विकेट्स गमावले. जोश टंगने एक तर गस एटकिन्सनने ३ विकेट्स घेत भारताचा डाव आटोपला.
इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात बॅझबॉल शैलीत फलंदाजी करत सिराज-आकाशदीपच्या गोलंदाजीवर आक्रमक फटकेबाजी केली. प्रत्येक षटकात चौकारांचा पाऊस पाडत सिराज-आकाशदीप-प्रसिधची लय बिघडवली. डकेटने तर स्कूप शॉट खेळत षटकार लगावले. पण या मालिकेत त्याच्यासाठी कर्दनकाळ ठरलेल्या आकाशदीपने पुन्हा एकदा त्याला बाद केलं.
आकाशदीपचा पुन्हा शिकार झाला बेन डकेट
आकाशदीपच्या गोलंदाजीवर बेन डकेट मोठमोठे फटके खेळत होता. स्कूप शॉट लगावत त्याने लगावलेल्या षटकाराने तर सर्वांचं लक्ष वेधलं. यानंतर १३व्या षटकातील पाचव्या चेंडूवर डकेट रिव्हर्स स्कूप मारायला गेला आणि विकेट देऊन बसला. रिव्हर्स स्कूपच्या प्रयत्नात चेंडू डकेटच्या बॅटची कड घेत गेला आणि जुरेलने चांगली डाईव्ह मारत झेल टिपला. यासह भारताला पहिली विकेट मिळाली.
बेन डकेट बाद झाल्यानंतर आकाशदीप आक्रमक सेलिब्रेशन केलं. आधी त्याच्यासमोर पंच करत जल्लोष केला आणि त्यानंतर डकेटच्या खांद्यावर हसत हसत हात ठेवत त्याला सेंड-ऑफ दिला. आकाशदीपच्या या कृतीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे आणि व्हीडिओसुद्धा व्हायरल होतो. आकाशदीप डकेटच्या खांद्यावर हात ठेवत त्याच्याशी बोलताना पाहताच केएल राहुल लगेच त्याच्याजवळ गेला आणि त्याला मागे खेचलं. अजून मोठा काही वाद किंवा बाचाबाची होण्याआधीच राहुलने त्याला मागे घेतलं आणि संघाने विकेटचं सेलिब्रेशन केलं.
बेन डकेटला या मालिकेतील ५ डावांपैकी ४ वेळा आकाशदीपने बाद केलं आहे. बेन डकेट ३८ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ४३ धावा करत बाद झाला. यासह भारताने डकेट-क्रॉलीची ९२ धावांची भागीदारी तोडली. तर जॅक क्रॉलीने मात्र अर्धशतक पूर्ण केलं. दुसऱ्या दिवशी लंचब्रेकपर्यंत इंग्लंडने १६ षटकांत १ बाद १०९ धावा केल्या आहेत.