ठाणेकर अक्षय देवलकर आणि प्रणव चोप्रा जोडीने कोची येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय खुल्या वरिष्ठ मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावले. पुरुषांमध्ये एच. एस. प्रणॉय तर महिलांमध्ये पी. व्ही. सिंधूने जेतेपदावर नाव कोरले. अक्षय-प्रणव जोडीने तासाभराहून अधिक काळ चाललेल्या मुकाबल्यात अल्विन फ्रान्सिस आणि अरुण विष्णू जोडीवर २१-९, २३-२५, २१-१९ अशी मात केली. गोपीचंद अकादमीचा विद्यार्थी असलेल्या प्रणॉयने अनुभवी अनुप श्रीधरवर २१-१३, २१-२ असा विजय मिळवला. लखनौ येथे झालेल्या सय्यद मोदी स्पर्धेत अंतिम लढतीत सायनाकडून पराभूत झालेली सिंधू पी. सी. तुलसीला २१-११, २१-११ असे नमवत विजयपथावर परतली. महिला दुहेरीत अपर्णा बालन आणि सिक्की रेड्डी जोडीने प्राजक्ता सावंत आणि अराथी सारा सुनील जोडीचा २१-१६, २१-१३ असा पराभव केला. मिश्र दुहेरीत अरुण विष्णू-अपर्णा बालन जोडीने सनावे थॉमस-प्राजक्ता सावंत जोडीचा २१-१८, २१-१८ असा पराभव करत जेतेपद पटकावले.