सेमी फायनलमध्ये प्रवेश केलेल्या ऑस्ट्रेलियाने अलाना किंगच्या दमदार प्रदर्शनाच्या बळावर दक्षिण आफ्रिकेचा डाव अवघ्या ९७ धावांतच गुंडाळला. अलानाने ७ षटकात २ निर्धाव षटकांसह १८ धावांच्या मोबदल्यात तब्बल ७ विकेट्स पटकावल्या. वनडे वर्ल्डकपमधला एका डावात सर्वाधिक विकेट्स मिळवण्याचा विक्रम आता अलानाच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियासाठी वनडेत एका डावात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा मान आता अलानाच्या नावावर आहे. वनडे क्रिकेटमध्ये एका डावात ७ विकेट्स पटकावणारी अलाना केवळ सहावी महिला क्रिकेटपटू आहे. याआधी साजिदा शहा, जेएम चेंबरलेन, अनिसा मोहम्मद, एलिसा पेरी, शेली निशके यांनी अशी कामगिरी केली आहे.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांनी याआधीच सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सराव सामनाच होता. मात्र ऑस्ट्रेलियाने सेमी फायनलसाठी एकदम तय्यार असल्याचं दाखवून देत दक्षिण आफ्रिकेला शंभरीही गाठू दिली नाही. यंदाच्या स्पर्धेत शंभरीच्या आत सर्वबाद होण्याची दक्षिण आफ्रिकेची ही दुसरी वेळ आहे.
इंदूर इथे सुरू असलेल्या या लढतीत ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. मेगन शूटने दक्षिण आफ्रिकेची अनुभवी आधारस्तंभ बॅटर लॉरा वॉल्वरहार्डला बाद करत आफ्रिकेला पहिला धक्का दिला. किम गॅरथने यंदाच्या वर्षात दमदार फॉर्मात असणाऱ्या ताझमिन ब्रिट्सला माघारी धाडलं. यानंतर अलाना किंगने आपल्या फिरकीच्या जोरावर आफ्रिकेच्या डावाला खिंडार पाडलं.
अलानाने सून लूस, अनरीन डेकरसन, मारिझान काप, सिनलो जाफा, चोले टायरॉन, नॅडीन क्लार्क, मसाबाटा क्वास या फलंदाजांना तंबूत परतावलं. अलानाने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना स्थिरावण्याची, पुनरागमनाची संधीच दिली नाही. लॉरा (३१), सिनलो जाफा (२९) नॅडीन क्लार्क (१४) यांचा अपवाद वगळता बाकी फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही.
या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत अव्वलस्थानी होता. मात्र ऑस्ट्रेलियाने त्यांना शंभरीच्या आत गुंडाळत गुणतालिकेत अव्वल राहण्याच्या दृष्टीने पायाभरणी केली.
