स्टुअर्ट ब्रॉडचे अर्धशतक; पहिल्या डावात ९ बाद ४९१

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अ‍ॅलिस्टर कुक. इंग्लंडच्या फलंदाजीचा मुख्य शिलेदार. पण गेल्या काही सामन्यांमध्ये त्याच्याकडून लौकिकाला साजेशी कामगिरी होत नव्हती. त्यामुळे निवड समिती आपल्याला डच्चू देणार, अशी भीती त्याच्या मनात होती. पण मेलबर्नच्या मैदानावर त्याला फॉर्म गवसला आणि पुन्हा एकदा शांतचित्ताने धावांची रास उभारणारा कुक पाहायला मिळाला. कुकच्या नाबाद द्विशतकाच्या जोरावर इंग्लंडने तिसऱ्या दिवसअखेर ९ बाद ४९१ अशी मजल मारत १६४ धावांची दमदार आघाडी घेतली आहे.

तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला जो रूटने (६१) अर्धशतक पूर्ण केले, संघाने दोनशे धावांचा पल्लाही गाठला. सारे काही आलबेल आहे असे वाटत असतानाच रूटला पॅट कमिन्सने बाद करत इंग्लंडला धक्का दिला. रूट पुन्हा एकदा अर्धशतक झळकावल्यावर मोठी खेळी साकारण्यात अपयशी ठरला. रूट बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केला, त्यामुळे इंग्लंडच्या मधल्या फळीतील फलंदाजांना जास्त काळ खेळपट्टीवर राहता आले नाही. इंग्लंडचा संघ फक्त नाममात्र आघाडी मिळवू शकेल असे वाटत होते. एका बाजूला कुक भक्कमपणे उभा असला तरी त्याला दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ मिळत नव्हती. पण स्टुअर्ट ब्रॉड यावेळी संघाच्या मदतीला धावून आला. एका बाजूने कुक शांतपणे फलंदाजी करत असला तरी ब्रॉडने मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर आक्रमण करायला सुरुवात केली. कुक आणि ब्रॉड यांनी नवव्या विकेटसाठी शंभर धावांची भागीदारी रचली. या भागीदारीत ब्रॉडचा वाटा थोडासा जास्त होता. ब्रॉडने ६३ चेंडूंत आठ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५६ धावांची खेळी साकारली. ब्रॉड बाद झाला असला तरी कुकचा अडसर मात्र ऑस्ट्रेलियाच्या मार्गात अजूनही कायम आहे.

कुकची ही विक्रमी द्विशतकी खेळी स्वत:साठी आणि संघासाठी तारणहार अशीच ठरली. कारण कुकने द्विशतक झळकावले नसते तर त्याला संघातील स्थान कायम राखता आले नसते आणि दुसरीकडे संघाला आघाडीही मिळवता आली नसती. कुकने या सामन्यात काही विक्रमांनाही गवसणी घातली. या मैदानात प्रतिस्पर्धी संघाच्या सर्वाधिक धावा आता कुकच्या नावावर आहेत, यापूर्वी या मैदानात वेस्ट इंडिजचे माजी महान फलंदाज व्हिव रीचर्ड्स यांनी १९८४ साली २०८ धावांची खेळी साकारली होती. त्याचबरोबर या मैदानात एका डावात इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करण्याचा मानही कुकने मिळवला आहे. यापूर्वी वॉली हॅमण्ड्स यांनी १९२८ साली २०० धावा केल्या होत्या. कुकचे हे १५१ कसोटी सामन्यांतील पाचवे द्विशतक ठरले, या खेळीसह कुकने वेस्ट इंडिजचा माजी महान फलंदाज ब्रायन लाराला मागे टाकत सर्वाधिक धावा (११,९५६) करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सहावे स्थान पटकावले आहे.

कुकची ही खेळी अविस्मरणीय असली तरी त्याला दोनदा जीवदान मिळाले आणि ही दोन्ही जीवदाने त्याला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने दिली आहेत. बुधवारी कुकचा ६६ धावांवर असताना स्मिथने झेल सोडला होता. गुरुवारी कुकचा १५३ धावांवर असताना स्मिथने स्क्वेअर लेगला झेल सोडला. कुकने या खेळीमध्ये तब्बल ४०९ चेंडूंचा सामना करत २७ चौकारांनिशी नाबाद २४४ धावा केल्या आहेत. आता इंग्लंडचा एक बळी शिल्लक असून कुक (२९४) आपल्या सर्वाधिक धावांना मागे टाकतो का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.

संक्षिप्त धावफलक

  • ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ३२७.
  • इंग्लंड : १४४ षटकांत ९ बाद ४९१ (अ‍ॅलिस्टर कुक नाबाद २४४, स्टुअर्ट ब्रॉड ५६, जो रूट ६१; जोश हेझलवूड ३/९५)
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alastair cook feels sorry for brian lara dedicates double ton to teammates
First published on: 29-12-2017 at 03:08 IST