scorecardresearch

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : भारतीय संघाचा विजयारंभ ; पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर पाच गडी राखून सरशी; हार्दिक, भुवनेश्वर, जडेजाची चमक

दुबई येथे झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने दिलेले १४८ धावांचे लक्ष्य भारताने १९.४ षटकांत गाठले.

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : भारतीय संघाचा विजयारंभ ; पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर पाच गडी राखून सरशी; हार्दिक, भुवनेश्वर, जडेजाची चमक
हार्दिक पंडय़ा ४-०-२५-३ ३३* (१७)

दुबई : हार्दिक पंडय़ाचे (तीन बळी आणि नाबाद ३३ धावा) अष्टपैलू योगदान, भुवनेश्वर कुमारचा (४/२६) भेदक मारा आणि रवींद्र जडेजाच्या (३५ धावा) अप्रतिम फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर पाच गडी आणि दोन चेंडू राखून सरशी साधत आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा विजयारंभ केला.     

दुबई येथे झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने दिलेले १४८ धावांचे लक्ष्य भारताने १९.४ षटकांत गाठले. नसीम शाहने डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर भारताचा सलामीवीर केएल राहुलचा त्रिफळा उडवला. यानंतर विराट कोहली (३४ चेंडूंत ३५) आणि कर्णधार रोहित शर्मा (१८ चेंडूंत १२) यांनी दुसऱ्या गडय़ासाठी ४९ धावांची भागीदारी रचत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, डावखुरा फिरकीपटू मोहम्मद नवाजने कोहली आणि रोहित या दोघांनाही इफ्तिकार अहमदकरवी झेलबाद केले. सूर्यकुमार यादवही (१८) फार काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. परंतु जडेजा (२९ चेंडूंत ३५ धावा) आणि हार्दिक (१७ चेंडूंत नाबाद ३३) यांनी ५२ धावांची भागीदारी रचत भारताला विजय मिळवून दिला.     

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिल्यावर पाकिस्तानचा डाव १९.५ षटकांत १४७ धावांत आटोपला. भुवनेश्वरने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला (१०) झटपट माघारी पाठवले. तसेच फखर झमान (१०) आवेश खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर मोहम्मद रिझवान (४२ चेंडूंत ४३) आणि इफ्तिकार (२२ चेंडूंत २८) यांनी ४५ धावांची भागीदारी रचली. मात्र, हार्दिकने या दोघांसह खुशदिल शाहला (२) दोन षटकांच्या अंतराने बाद केले, तर भुवनेश्वरने शादाब खान (१०), आसिफ अली (९) आणि नसीम शाह (०) यांना माघारी धाडले. परंतु, शाहनवाज दहानी (६ चेंडूंत नाबाद १६) आणि हॅरिस रौफ (७ चेंडूंत नाबाद १३) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे पाकिस्तानला दीडशे धावांनजीक पोहोचता आले.

संक्षिप्त धावफलक 

पाकिस्तान : १९.५ षटकांत सर्वबाद १४७ (मोहम्मद रिझवान ४३, इफ्तिखार अहमद २८;  भुवनेश्वर कुमार ४/२६, हार्दिक पंडय़ा ३/२५) पराभूत वि. भारत : १९.४ षटकांत ५ बाद १४८ (रवींद्र जडेजा ३५, हार्दिक पंडय़ा नाबाद ३३; नसीम शाह २/२७, मोहम्मद नवाज ३/३३)

प्रशिक्षक द्रविड करोनामुक्त

भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड करोनामुक्त झाला असून तो संयुक्त अरब अमिराती येथे दाखल झाला आहे. त्याने रविवारी पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या आशिया चषकातील सामन्यात मैदानावर उपस्थित राहून भारतीय खेळाडूंना मार्गदर्शनही केले. द्रविडच्या जागी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणची हंगामी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र, द्रविड आता करोनातून सावरल्यामुळे लक्ष्मणला पुन्हा मायदेशी पाठवण्यात आले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या