पीटीआय, झाग्रेब
जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत दुसऱ्या दिवशी भारताला सर्वात मोठा धक्का बसला. वाढीव वजनामुळे ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या अमन सेहरावतला लढतीसाठी अपात्र धरण्यात आले.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत विनेश फोगटकडून अशीच चूक झाली होती. त्याच चुकीची पुनरावृत्ती जागतिक स्पर्धेत अमन सेहरावतकडून झाली. यामुळे पुन्हा एकदा भारतीय कुस्तीगीरांच्या निष्काळजीपणा, तसेच प्रशिक्षक, प्रशासक यांच्या कार्यपद्धतीवर निश्चितपणे शंका घेतली जाईल. विनेशचे वजन काही ग्रॅमने अधिक भरले होते. जागतिक स्पर्धेत ५७ किलो वजनी गटात खेळणाऱ्या अमनचे वजन थोडेथोडके नाही, तर तब्बल १.७ म्हणजे पावणे दोन किलो अधिक भरले.
जागतिक स्पर्धेसाठी तयारी करत असताना आणि झाग्रेब येथे येईपर्यंत सर्वकाही सुरळीत होते. पण, प्रत्यक्ष वजन करण्याच्या दिवशी अमनचे वजन इतके अधिक भरल्याने सगळेच चक्रावून गेले आहेत. ‘‘हे दुर्दैवी आणि खेदजनक आहे. इतक्या मोठ्या स्पर्धेत उतरत असताना अमन वजन राखू शकला नाही हे आश्चर्यकारक आहे. वजनाच्या वेळी अमनचे वजन इतके अधिक कसे भरले हे आमच्या समजण्यापलीकडचे आहे,’’ असे भारतीय पथकातील एका सूत्राने सांगितले.
संयुक्त जागतिक कुस्ती महासंघाच्या नियमानुसार विश्वचषक, मानांकन स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी दोन किलोची मुभा मल्लांना असते. पण, ऑलिम्पिक आणि जागतिक स्पर्धेसाठी अशी कुठलीच तरतूद नाही.
तिसरी वेळ
वाढीव वजनामुळे भारतीय मल्ल अपात्र ठरण्याची ही तिसरी वेळ. सर्वात प्रथम पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत विनेश फोगट अशा पद्धतीने अपात्र ठरली होती. त्यानंतर जागतिक स्पर्धेत अमन अपात्र ठरला. विशेष म्हणजे या स्पर्धेपूर्वी बल्गेरियात झालेल्या २० वर्षांखालाली जागतिक स्पर्धेत नेहा अशाच पद्धतीने अपात्र ठरली होती. भारतीय कुस्ती महासंघाने यामुळे तिला वरिष्ठ जागतिक स्पर्धेसाठी विचारातच घेतले नाही, तर तिच्यावर दोन वर्षांचे निलंबन लादले. आता अमनबाबत महासंघ काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दीपक पुनियाचे अपयश कशामुळे?
अमनपाठोपाठ ऑलिम्पियन आणि अनुभवी दीपक पुनियाचे अपयशदेखील भारतासाठी धक्कादायक ठरले. दीपकला ९२ किलो वजनी गटात ओस्मान नुर्मागोमेडोवकडून पराभूत व्हावे लागले. ओस्मानच्या पुढील प्रगतीवर दीपकच्या रेपिचेजच्या आशा अवलंबून राहणार आहेत. पण, सुरुवातीलाच दीपकचा पराभव भारतासाठी खेदजनक आहे. यामागे वजन व्यवस्थापनेतील अडचणच कारणीभूत ठरत आहे. दीपक ८६ किलोमधील खेळाडू आहे. या वजनी गटात चांगले स्थिरावल्यानंतर भविष्यात वजन वाढीचा धोका लक्षात घेऊन दीपकने ९२ किलो गटातून खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र, या वजनी गटात अजून तो स्थिरावलेला नाही. सातत्याने त्याला अपयशाला सामोरे जावे लागत आहे.