India vs South Africa Women’s World Cup 2025 : आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेच्या फायनल सामन्यात भारतीय संघाने दिलेल्या २९९ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने दिमाखात सुरुवात केली. पहिली काही षटके सावध फलंदाजी केल्यानंतर दोन्ही सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांवर अचानक आक्रमण केलं. नवव्या षटकांत आफ्रिकेचा डाव बिनबाद पन्नाशीपार पोहोचला होता. त्यामुळे भारतीय संघावरील दडपण वाढत होतं. त्याचवेळी अमनज्योत कौरने उत्तम क्षेत्ररक्षण करीत सुरेख फलंदाजी करणाऱ्या तॅझमिन बिट्सला धावबाद केलं. तिने केलेल्या रॉकेट ‘थ्रो’चा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार लॉरा वोल्वार्ड आणि तॅझमिन बिट्स मैदानात उतरल्या. पहिल्या सहा षटकांत भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करीत दोन्ही सलामीवीरांना रोखून धरलं होतं; पण मैदानावर जम बसल्यानंतर वोल्वार्ड आणि बिट्सने आक्रमक फटके खेळून धावगती वाढवण्यास सुरुवात केली. परिणामी आफ्रिकेची धावसंख्या बिनबाद पन्नाशीपार पोहोचली. त्याचवेळी बिट्सने रेणुका सिंह ठाकूरच्या गोलंदाजीवर झटपट धाव घेण्याचा प्रयत्न केला. मिडऑनवर उभ्या असलेल्या अमनज्योत कौरही हीच संधी हेरली आणि रॉकेट थ्रो करून दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का दिला.

आणखी वाचा : हरमनप्रीत कौरला जेव्हा ९१ मीटर सिक्ससाठी डोपिंग टेस्ट द्यावी लागली होती….

अमनज्योत कौरचा रॉकेट थ्रो

अमनज्योतचा थ्रो डायरेक्ट स्टंपला लागल्याने तॅझमिन बिट्सला मैदान सोडावं लागलं. तिने ३५ चेंडूचा सामना करताना दोन चौकार आणि एका षटकारासह २३ धावा चोपल्या. भारतीय संघाला पहिले यश मिळताच प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या ॲनेके बॉशला डावखुरी फिरकीपटू श्री चरणीने भोपळाही फोडू दिला नाही. एका बाजूला एकेक फलंदाज बाद होत असताना कर्णधार लॉरा वोल्वार्ड मैदानावर तग धरून होती. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा आफ्रिकेने २५ षटकांत चार गड्यांचे मोबदल्यात १२६ धावा केल्या होत्या.

शैलाफी वर्मा चमकली

तत्पुर्वी दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून सलामीला आलेल्या स्मृती मानधनाने ४५ तर शफाली वर्माने ८७ धावांची खेळी केली. सेमीफायनल सामन्यातील हिरो जेमिमा रॉड्रिग्ज या सामन्यात २४ धावांवर माघारी परतली. तर हरमनप्रीत कौरने २०, दीप्ती शर्माने ५८, अमनजोत कौरने १२, रिचा घोषने ३४ आणि राधा यादवने ३४ धावांची खेळी केली. भारताने ५० षटकांअखेर २९८ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सेमीफायनल सामन्यात इंग्लंडला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर दुसरीकडे भारतीय संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.