Ambati Rayudu Shocking Revelation on Suryakumar Yadav T20 WC 2024 Final Catch: भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली टी-२० विश्वचषक २०२४ चे जेतेपद पटकावले. बार्बाडोसमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा रोमहर्षक सामन्यात पराभव केला होता. या सामन्यातील अखेरच्या षटकात सूर्यकुमार यादवने टिपलेला झेल कायमच सर्वांच्या लक्षात राहणारा आहे. पण या झेलबाबत आता भारताचा माजी खेळाडू अंबाती रायुडू याने मोठं वक्तव्य केलं आहे.

अखेरच्या षटकातील हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवने सीमारेषेजवळ डेव्हिड मिलरचा एक जबरदस्त झेल टिपला. या झेलने भारताचा विजय जवळजवळ निश्चित केला. सूर्याने सीमारेषेजवळ झेल टिपला आणि तोल जात असल्याने तो मैदानात फेकला आणि पलीकडे जाऊन पुन्हा मैदानात येऊन झेल घेतला. त्याच्या झेलवरून अनेक चर्चा झाल्या, तो झेल नियमांप्रमाणे योग्य नव्हता आणि बऱ्याच चर्चा ऐकायला मिळाली.

अंबाती रायुडूने पुन्हा एकदा सूर्याच्या या झेलबाबत वक्तव्य करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रायुडूने एका मुलाखतीत सांगितलं की सूर्याने सीमारेषेजवळ झेल घेतला, ती बाउंड्री मागे सरकवण्यात आली होती. त्यात कोणतीही गडबड झाली नव्हती.

अंबाती रायुडूचा सूर्याच्या कॅचबाबत मोठा खुलासा

अंबाती रायुडूने शुभांकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “झालं असं की वर्ल्ड फीड कॉमेंटेटर्स ब्रेकमध्ये खुर्ची ठेवतात आणि त्याच्यावर स्क्रीन लावतात, जेणेकरून ब्रॉडकास्टर्स काय चाललंय हे नीट पाहू शकतील. त्यामुळे त्यांनी सीमारेषा थोडी मागे केली आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा तशीच ठेवली. त्यामुळे आपल्यासाठी सीमारेषा थोडी मोठी झाली होती. आम्ही वरून पाहत होतो, ती देवाची कृपा होती.”

रायुडू बोलणं ऐकताच शुभांकर मिश्रा आश्चर्यचकित होतात. पुढे ते रायुडूला विचारतात म्हणजे “तो षटकार होता ?” यावर रायुडू म्हणतो, “षटकार होता की नाही माहित नाही. जर सीमारेषा आपल्याच जागी असती तर सूर्यकुमार आतूनच धावला असता. त्या दिवशी खरंच देव आपल्यासोबत होता. सर्वजण खूप आनंदी होते. तो झेल एकदम नीट आणि योग्य होता. त्यात ना आपली चूक होती ना त्यांची. शेवटी देव आणि (जसप्रीत) बुमराह आपल्यासोबत होते.”

अंबाती रायुडूच्या या वक्तव्यावर काही जणांनी त्याला ट्रोलदेखील केलं आहे. चाहते म्हणत आहेत, आधी त्याने म्हटलं की, कॉमेंटेटर्सने सूर्याला मदत केली आणि नंतर सावरण्यासाठी देव संघाबरोबर असल्याचं वक्तव्य त्याने केलं. अंबाती रायुडूच्या या वक्तव्याचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.