BCCI च्या अध्यक्षपदी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची वर्णी लागली. गांगुलीच्या आगमनानंतर बीसीसीआय संघटनेत मोठे बदल व्हायला सुरुवात झाली. गेली अनेक वर्ष दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यास नकार देणाऱ्या भारतीय संघाने गांगुलीच्या पुढाकारामुळे बांगलादेशविरुद्ध पहिला दिवस-रात्र कसोटी सामना मिळाला. मात्र लोढा समितीने सुचवलेल्या शिफारसींनुसार गांगुलीचं हे अध्यक्षपद औट घटकेचं ठरणार आहे. तरीही सौरव गांगुली बीसीसीआयमध्ये अध्यक्षपदी रहावा यासाठी आता बीसीसीआय आपल्या संविधानातील महत्वाचा नियम बदलण्याच्या तयारीत आहे.

बीसीसीआय आपल्या संविधानातील Cooling-off period या नियमात बदल करण्याच्या विचारात आहे. आपल्या आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत बीसीसीआयचे नवीन अधिकारी या विषयावर चर्चा करतील. संघटनेचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी ही माहिती दिली.

  • काय आहे Cooling-off period ?

लोढा समितीने सुचवलेल्या शिफारसींनुसार, सर्वोच्च न्यायालयाने BCCI च्या संविधानात महत्वाच्या बदलांना मान्यता दिली आहे. कोणत्याही पदाधिकाऱ्याने राज्य किंवा BCCI मध्ये ३ वर्षांचे दोन कार्यकाळ पूर्ण केले असतील, त्याला पुढील ३ वर्ष कोणतंही पद भूषवता येणार नाही.

याचसोबत संविधानानूसार, वयाची सत्तरी पार केलेल्या व्यक्तीला संघटनेत कोणतही पद भूषवता येणार नाहीये.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सुत्र सांभाळायच्या आधी बंगाल क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्षपद सांभाळलं होतं. त्यामुळे गांगुलीची अध्यक्षपदाचा काळ हा काही महिन्यांचाच ठरणार आहे. “वयाचा नियम बदलण्याचा आमचा विचार नाही. यामध्ये कोणतेही बदलही सुचवण्यात आलेले नाहीत. Cooling-off period संदर्भात संघटनेतील अधिकाऱ्यांनी आपली मतं मांडली आहेत. जर एखाद्या व्यक्तीकडे राज्य संघटना चालवण्याचा अनुभव असेल, तर मग त्या अनुभवाचा संघटनेच्या कामकाजासाठी वापर का करु नये? त्याला Cooling-off period देण्यात काय अर्थ उरतो?” अरुण धुमाळ यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं.

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. त्यामुळे या बैठकीत नवीन अधिकारी सौरव गांगुलीच्या Cooling-off period बद्दल काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.