वृत्तसंस्था, न्यूयॉर्क : अमेरिकेच्या कोको गॉफने आपली आदर्श सेरेना विल्यम्सच्या पावलावर पाऊल ठेवताना कमी वयातच ग्रँडस्लॅम विजेती म्हणून मिरवण्याचा मान मिळवला आहे. १९ वर्षीय कोकोने दुसऱ्या मानांकित अरिना सबालेन्काचा संघर्षपूर्ण अंतिम लढतीत पराभव करत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील महिला एकेरीचे जेतेपद पटकावले. तिच्या युवा कारकीर्दीतील हे पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले.
आर्थर अॅश स्टेडियमवर झालेल्या अंतिम लढतीत कोकोने बेलारुसच्या सबालेन्काचे आव्हान २-६, ६-३, ६-२ असे मोडून काढले. ही लढत २ तास ६ मिनिटे चालली. जुलै महिन्यात विम्बल्डन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर कोकोने व्यावसायिक टेनिसमध्ये जबरदस्त पुनरागमन केले. वॉशिंग्टन, सिनसिनाटी स्पर्धा जिंकल्यानंतर शनिवारी कोकोने कारकीर्दीतील सर्वात मोठे विजेतेपद मिळवले.
कोकोसाठी अंतिम लढतीची सुरुवात निराशाजनक होती. सबालेन्काने तिची पहिलीच सव्र्हिस भेदत २-० अशी आघाडी घेतली. मात्र, नंतर सबालेन्कालाही आपली सव्र्हिस अचूक करता आली नाही. चौथ्या गेममध्ये कोकोने २-२ अशी बरोबरी साधली. परंतु पुन्हा कोकोची सव्र्हिस तोडत आणि आपली सव्र्हिस राखत सबालेन्काने ४-२ अशी आघाडी घेतली. सबालेन्काने पुन्हा एकदा ब्रेकची संधी साधताना ५-२ अशी मोठी आघाडी मिळवली. पुढे आपली सव्र्हिस राखत सबालेन्काने पहिला सेट जिंकला.
दुसऱ्या सेटपासून मात्र कोकोने अधिक परिपक्वतेने खेळ केला. कोकोने आक्रमक सुरुवात करताना ३-१ अशी भक्कम आघाडी मिळवली. यानंतर कोकोने मागे वळून पाहिले नाही. दुसरा सेट जिंकल्यानंतर कोकोचा आत्मविश्वास वाढला. सव्र्हिसवर अडखळणाऱ्या सबालेन्काला कोकोने पुन्हा अडचणीत आणले. तिने सलग दोन वेळा सबालेन्काची सव्र्हिस भेदली आणि आपली सव्र्हिस राखत ४-० अशी मोठी आघाडी घेतली. पाचव्या गेममध्ये सबालेन्काने सव्र्हिस राखली खरी, पण त्यापूर्वी तिला डाव्या पायावर उपचार घेण्यासाठी वेळ मागून घ्यावी लागली. याचा तिच्या खेळावर परिणाम झाला आणि ही संधी कोकोने सोडली नाही. कोकोने तिसरा गेमही तितकाच सहज जिंकत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
खुल्या स्पर्धाच्या युगात (१९६८ पासून) अमेरिकन स्पर्धेच्या महिला एकेरीत जेतेपद मिळवणारी कोको गॉफ ही २८वी टेनिसपटू आहे. या स्पर्धेत सर्वाधिक जेतेपदांचा विक्रम सेरेना आणि ख्रिस एव्हर्ट (प्रत्येकी सहा) यांच्या नावे आहे. या विजेतेपदाने मला सुखद धक्का बसला आहे. गेल्या वर्षी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील हार जिव्हारी लागली होती. त्यानंतर हे विजेतपद म्हणजे माझ्या कारकीर्दीतला कल्पना करू शकत नाही इतका गोड क्षण आहे. माझ्यावर ज्यांचा विश्वास नाही अशा सर्व चाहत्यांची मी आभारी आहे. टीकेमुळे मला माझ्यातील क्षमतेची जाणीव झाली. माझ्यातील जिंकण्याची जिद्द अधिकच वाढली. गेल्या वर्षी इगा श्वीऑनटेकला करंडक उंचावताना मी पाहिले होते. ती जे अनुभवत आहे, ते मलाही अनुभवायचे आहे, असे मी स्वत:लाच सांगत होते. आज तो क्षण मीही अनुभवला. – कोको गॉफ
ग्रँडस्लॅम विजेतेपदापासून वंचित राहावे लागले असले, तरी मी निराश निश्चित नाही. जागतिक टेनिस क्रमवारी आता जाहीर होईल, तेव्हा मी अव्वल स्थानावर असेन. मला स्वत:चा अभिमान वाटतो. इतकी वर्षे मेहनत घेतल्यानंतर मी इथपर्यंत येऊन पोहोचले आहे. मला आता वर्षांच्या अखेरीसही अव्वल स्थानावर राहायचे आहे. म्हणूनच पराभवानंतरही मी सकारात्मक विचार करत आहे. – अरिना सबालेन्का