नवी दिल्ली:भारतीय बॉक्सिंगपटूंनी शानदार कामगिरीचे प्रदर्शन करत जर्मनीतील कलोन येथे झालेल्या विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धेत तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदांसह एकूण नऊ पदकांची कमाई केली. अमित पंघालच्या सुवर्णपदकानंतर महिला बॉक्सिंगपटू सिम्रनजीत कौर (६० किलो) आणि मनीषा मौन (५७ किलो) यांनी शनिवारी रात्री सुवर्णयश संपादन केले.

मनीषाने भारताच्याच साक्षी चौधरी हिचा ३-२ असा पराभव केला. साक्षीने पहिल्या फेरीत जोरदार ठोसे लगावत मनीषासमोर कडवे आव्हान उभे केले होते. पण पुढील दोन फेऱ्यांमध्ये मनीषाने सरशी साधत सुवर्णपदकाची कमाई केली. सिम्रनजीतने जर्मनीच्या माया क्लिएनहान्स हिच्यावर ४-१ अशी सरशी साधत सुवर्णपदकावर नाव कोरले. भारताने नऊ पदके मिळवत या स्पर्धेत सर्वसाधारण दुसरे स्थान प्राप्त केले. शनिवारी पुरुषांमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या अमितने (५२ किलो) सुवर्णपदकाची कमाई केली होती.

भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत ६७ दिवसांच्या युरोपमधील प्रशिक्षण शिबिराची यशस्वी सांगता केली. भारताच्या सतीश कुमारला (९१ किलो) जर्मनीच्या नेल्वी टियाफॅकविरुद्धच्या अंतिम फेरीत दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

सोनिया लाथेर (५७ किलो), पूजा राणी (७५ किलो), गौरव सोलंकी (५७ किलो) आणि मोहम्मद हुस्सामुद्दीन (५७ किलो) यांना उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.