भारताचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद याला झुरिच बुद्धिबळ चॅलेंज स्पर्धेत बोरिस गेल्फंडविरुद्ध बरोबरी स्वीकारावी लागली. आनंदने गतवर्षी गेल्फंडला विश्वविजेतेपदाच्या लढतीत पराभूत केले होते.
आनंद व गेल्फंड यांच्याप्रमाणेच व्लादिमीर क्रामनिक व फॅबिआनो कारुआना यांच्यातील डावही बरोबरीत राहिला. चार खेळाडूंच्या अव्वल दुहेरी साखळी स्पर्धेत चारही खेळाडूंचे प्रत्येकी दीड गुण झाले आहेत.  
गतवर्षी विश्वविजेतेपदाच्या लढतीत गेल्फंडने आनंदला चिवट झुंज दिली होती. येथेही आनंदला त्याने शेवटपर्यंत झुंजविले. सिसिलीयन नाजदॉर्फ तंत्राचा उपयोग करीत गेल्फंडने आनंदला पेचात टाकण्याचा प्रयत्न केला. आनंदने सुरुवातीला एक प्यादे जिंकले. त्याची बाजू थोडीशी वरचढ झाली होती. तथापि दोन्ही खेळाडूंनी एकमेकांचे मोहरे घेतले. त्यावेळी पुन्हा गेल्फंडने स्थिती समान केली. अखेर ४२ व्या चालीस दोन्ही खेळाडूंनी बरोबरी मान्य केली.