अंतिम फेरीत नोव्हाक जोकोव्हिचला पराभवाचा धक्का

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या आणि अद्भुत विजयी सूर गवसलेल्या नोव्हाक जोकोव्हिचला पराभवाचा धक्का देत अँडी मरेने रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला. जोकोव्हिचसारख्या मातब्बर खेळाडूला चीतपट करून मरेने २९वा वाढदिवस दणक्यात साजरा केला. मरेने अंतिम लढतीत जोकोव्हिचवर ६-३, ६-३ अशी मात केली.

काही दिवसांपूर्वीच झालेल्या माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम लढतीत जोकोव्हिचने मरेवर मात केली होती. या लढतीत झालेल्या चुकांतून बोध घेत मरेने दिमाखदार विजयाची नोंद केली. १९३१ नंतर इंग्लंडच्या एकाही टेनिसपटूला रोम स्पर्धेचे जेतेपद पटकावता आलेले नव्हते. मरेने ही उणीवही भरून काढली. वर्षांतील दुसरी स्पर्धा अर्थात फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर मरेसाठी क्ले कोर्ट स्पर्धेचे जेतेपद आत्मविश्वास उंचावणारे आहे. जोकोव्हिचविरुद्धच्या ३२ लढतीत मरेचा हा केवळ दहावा विजय आहे. कारकीर्दीत क्ले कोर्ट स्पर्धेचे मरेचे हे केवळ तिसरेच जेतेपद आहे. उपांत्य फेरीत मरेने नवख्या ल्युकास पौइलीचा धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली. दुसरीकडे जोकोव्हिचला केई निशिकोरीच्या संघर्षांला सामोरे जावे लागले. अचूक सव्‍‌र्हिस, ताकदवान परतीचे फटके आणि कोर्टवरच्या सर्वागीण वावराच्या बळावर मरेने संपूर्ण सामन्यात वर्चस्व गाजवले.

सेरेनाला जेतेपद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तब्बल नऊ महिन्यांचा जेतेपदांचा दुष्काळ संपवत सेरेना विल्यम्सने सरशी साधली. अंतिम लढतीत सेरेनाने मॅडिसन की हिच्यावर ७-६ (५), ६-३ अशी मात केली. रोम मास्टर्स स्पर्धेचे सेरेनाचे हे चौथे जेतेपद आहे. सेरेनाने गेल्या वर्षी सिनसिनाटी स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर दुखापती आणि ढासळत्या फॉर्ममुळे सेरेनाला जेतेपदांनी हुलकावणी दिली आहे. जेतेपदासह सेरेनाने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावरची पकड घट्ट केली आहे. अ‍ॅग्निझेस्का रडवानस्काने द्वितीय स्थान पटकावले आहे. अँजेलिक कर्बर तिसऱ्या स्थानी आहे.