आशिया चषक स्पर्धेत भारतीय खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याच्या मुद्यावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती. पाकिस्तानची ही मागणी अंशत: मान्य झाल्याचे संकेत मिळत आहेत. आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानच्या उर्वरित लढतींकरता सामनाधिकारी म्हणून पायक्रॉफ्ट यांच्याऐवजी वेस्ट इंडिजच्या रिची रिचर्डसन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डातील सूत्रांनी पीटीआय आणि एएनआयला यासंदर्भात माहिती दिली. मात्र यासंदर्भात आयसीसीने अधिकृत घोषणा केलेली नाही. आज पाकिस्तान-युएई सामना होणार आहे.

भारत-पाकिस्तान लढतीत भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघा यांनी नाणेफेकीच्या वेळेस हस्तांदोलन केलं नाही. सामना संपल्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन नाकारलं. या प्रकारामुळे नाराज होऊन पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघा पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहिला नाही. पत्रकार परिषदेला त्याच्याऐवजी प्रशिक्षक माईक हेसन उपस्थित होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हे प्रकरण पुढे रेटत सामनाधिकाऱ्यांना लक्ष्य केलं. पायक्रॉफ्ट यांनी हस्तांदोलन करू नका अशी सूचना दिल्याचा आरोप पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केला. पायक्रॉफ्ट यांची तातडीने हकालपट्टी करावी अशी मागणी पीसीबीने केली होती. मागणी पूर्ण न झाल्यास उर्वरित सामन्यांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा पाकिस्तानने दिला.

आयसीसीने पीसीबीची ही मागणी फेटाळली. आयसीसीचे जनरल मॅनेजर वासीम खान यांची या कागदपत्रांवर स्वाक्षरी होती. त्यांनी याआधी पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलं आहे. दिवसभराच्या वाटाघाटींनंतर सुवर्णमध्य काढण्यात आला. आशिया चषकातल्या पाकिस्तानच्या उर्वरित सामन्यांना रिची रिचर्डसन हे सामनाधिकारी म्हणून काम पाहतील. पायक्रॉफ्ट यांच्याऐवजी रिचर्डसन यांची नियुक्ती झाल्याने आशियाई क्रिकेट परिषदचे प्रमुख आणि पीसीबीचे चेअरमन मोहसीन नक्वी यांची बाजू सावरली गेली आहे.

पाकिस्तानने आशिया चषकातून माघार घेतल्यास त्यांचं १.२० कोटी अमेरिकन डॉलर्सचं नुकसान होऊ शकतं. आशियाई क्रिकेट परिषदेच्या वार्षिक महसूलावरही पाणी सोडावं लागेल. आशियाई क्रिकेट परिषदेच्या वार्षिक महसुलातील ७५ टक्के हिस्सा (प्रत्येकी १५ टक्के) भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान या कसोटी खेळणाऱ्या संघांना मिळतो.

पाकिस्तानच्या संघाने युएईच्या सामन्यासाठी सराव केला. मात्र सामन्याआधीची पत्रकार परिषद त्यांनी रद्द केली. पाकिस्तानच्या संघाने भारतीय संघ सराव करत होता त्याच भागात सरावही केला. मात्र त्यांनी भारतीय खेळाडूंशी संवाद साधला नाही.

कोण आहेत रिची रिचर्डसन?

६३वर्षीय रिचर्डसन हे वेस्ट इंडिजचे माजी खेळाडू आहेत. ८६ टेस्ट, २२४ वनडेत त्यांनी वेस्ट इंडिजचं प्रतिनिधित्व केलं. प्रदीर्घ काळ त्यांनी वेस्ट इंडिजचं कर्णधारपदही भूषवलं. फलंदाज आणि कर्णधार म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. २०१५ मध्ये त्यांची आयसीसीने सामनाधिकारी म्हणून नियुक्ती केली. अँटिगा आणि बर्बुडाचे कमिशनर ऑफ स्पोर्ट्स म्हणूनही ते काम पाहतात. वेस्ट इंडिज संघाचे व्यवस्थापक म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. त्यांना सर या उपाधीने गौरवण्यात आलं.