श्रीलंकेचे माजी वर्ल्डकप विजेते कर्णधार अर्जुन रणतुंगा यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यो फोटोमध्ये त्यांनी खूप वजन घटवलं असून त्यांचा फोटो पाहून सर्वच जण चकित झाले आहेत. श्रीलंका क्रिकेटच्या सुवर्णकाळातील चार दिग्गज खेळाडू सनथ जयसूर्या, अरविंद डी सिल्वा, अर्जुन रणतुंगा आणि मुथय्या मुरलीधरन यांच्या एकत्र फोटोमध्ये रणतुंगा दिसत आहेत.

या फोटोमधील ४ माजी श्रीलंकन खेळाडूंनीच संघाला १९९६ मध्ये स्पर्धेचं जेतेपद पटकावून दिलं होतं. दिग्गज श्रीलंकन खेळाडूंची ही चौकडी अलीकडेच तमिळ युनियनच्या १२५ व्या स्थापना दिनाच्या समारंभात एकत्र दिसले. सनथ जयसूर्याने हा फोटो एक्सवर शेअर केला होता.

हा समारंभातील एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला, ज्यामध्ये अर्जुन रणतुंगा लाल कुर्त्यात दिसत होते, परंतु त्यांचा बदललेला लूक पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले. एकेकाळी मोठी शरीरयष्टी असलेले अर्जुन रणतुंगा आता इतके बारीक आणि फिट दिसत होते की बरेच लोक त्यांना ओळखू शकले नाहीत. एका युजरने तर लिहिलं की, “लाल कुर्ता घातलेली व्यक्ती खरोखर रणतुंगा आहे का?”

रणतुंगा त्यांच्या १८ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत नेहमीच स्थूल क्रिकेटपटूंपैकी एक मानले जात असत, परंतु त्यांच्या कामगिरीवर याचा परिणाम कधीच दिसून आला नाही. कायमच त्यांनी क्रिकेटच्या मैदानावर उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांनी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये मिळून जवळपास १२,५०० धावा केल्या. पण कधीकधी ते फिटनेससंबंधित वादात अडकले आहेत, जसे की सामन्यांदरम्यान रनरची मागणी करत असत, ज्यामुळे ऑस्ट्रेलियन कर्णधार इयान हिली देखील संतापला होता.

आता ६१ वर्षांच्या रणतुंगा यांनी आपल्या फिटनेसमध्ये कमालीचा बदल केला आहे. २०२३ च्या आशिया चषकमध्ये जेव्हा त्यांनी एसीसी आणि बीसीसीआयबद्दल टीका केली होती, तेव्हा त्यांचा नवीन लूक चर्चेत आला होता. त्यांनी कधीही वजन कमी करण्यामागणं कारण जाहीर केलं नाही.

अर्जुन रणतुंगा हे श्रीलंकेच्या सर्वात यशस्वी एकदिवसीय फॉरमॅटमधील कर्णधारांपैकी एक आहेत. त्यांनी १९३ सामन्यांपैकी८९ सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून देत जागतिक क्रिकेटच्या सर्वोच्च शिखरावर नेलं. त्यांनी ९३ कसोटी आणि २६९ एकदिवसीय सामने खेळले, परंतु त्यांची खरी ओळख त्यांच्या नेतृत्त्व कौशल्यामुळे होती. मुरलीधरनला चकिंगसाठी नो-बॉल देण्यात आल्यानंतर, त्यांच्या खेळाडूच्या समर्थनार्थ त्यांनी सामना खेळण्यास नकार देत संघांला मैदानाबाहेर नेलं होतं.