scorecardresearch

आर्सेनलची अग्रस्थानावरील पकड मजबूत; प्रीमियर लीग फुटबॉलच्या सामन्यात ब्रायटनवर मात

७७व्या मिनिटाला इव्हान फग्र्युसनने ब्रायटनसाठी दुसरा गोल केला. परंतु यानंतर आर्सेनलने भक्कम बचाव करताना सामना जिंकला.

आर्सेनलची अग्रस्थानावरील पकड मजबूत; प्रीमियर लीग फुटबॉलच्या सामन्यात ब्रायटनवर मात
इंग्लंडमधील आघाडीचा संघ आर्सेनलने ब्रायटनवर ४-२ अशी मात करत प्रीमियर लीग फुटबॉलच्या गुणतालिकेतील अग्रस्थानावरील पकड अधिक मजबूत केली आहे.

ब्रायटन : इंग्लंडमधील आघाडीचा संघ आर्सेनलने ब्रायटनवर ४-२ अशी मात करत प्रीमियर लीग फुटबॉलच्या गुणतालिकेतील अग्रस्थानावरील पकड अधिक मजबूत केली आहे.

बुकायो साका (दुसऱ्या मिनिटाला), कर्णधार मार्टिन ओडेगार्ड (३९व्या मि.), एडी एन्केटिया (४७व्या मि.) आणि गॅब्रिएल मार्टिनेली (७१व्या मि.) यांनी केलेल्या गोलच्या जोरावर आर्सेनलला विजय मिळवता आला. हा आर्सेनलचा १६ सामन्यांत १४वा विजय ठरला. त्यामुळे त्यांचे ४३ गुण झाले असून दुसऱ्या स्थानावरील मँचेस्टर सिटीचे १६ सामन्यांत ३६ गुण आहेत. आर्सेनलकडे सात गुणांची आघाडी आहे.

ब्रायटनविरुद्धच्या सामन्यात आर्सेनलने सुरुवातीपासून अप्रतिम खेळ केला. साकाने दुसऱ्याच मिनिटाला गोल करत आर्सेनलला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ३९व्या मिनिटाला ओडेगार्डने उत्कृष्ट फटका मारत आर्सेनलची आघाडी दुप्पट केली. तर ४७व्या मिनिटाला एन्केटिनने आर्सेनलसाठी तिसरा गोल केला. मात्र, यानंतर ब्रायटनने आपला खेळ उंचावला. ६५व्या मिनिटाला काओरू मिटोमाने ब्रायटनचे गोलचे खाते उघडले. परंतु दुसरीकडे ओडेगार्डच्या पासवर मार्टिनेलीने गोल करत आर्सेनलला ४-१ अशी आघाडी मिळवून दिली. मग ७७व्या मिनिटाला इव्हान फग्र्युसनने ब्रायटनसाठी दुसरा गोल केला. परंतु यानंतर आर्सेनलने भक्कम बचाव करताना सामना जिंकला.

अन्य सामन्यात, मँचेस्टर सिटीला एव्हर्टनने १-१ अशा बरोबरीत रोखले. तारांकित आघाडीपटू अर्लिग हालँडने २४व्या मिनिटाला गोल करत सिटीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, ६४व्या मिनिटाला डिमारी ग्रेने केलेल्या गोलमुळे एव्हर्टनला सामन्यात बरोबरी साधण्यात यश आले.

मँचेस्टर युनायटेड विजयी

उत्तरार्धात आघाडीपटू मार्कस रॅशफोर्डने केलेल्या गोलच्या जोरावर मँचेस्टर युनायटेडने प्रीमियर लीगच्या सामन्यात वोल्व्हसवर १-० अशी सरशी साधली. सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. उत्तरार्धात युनायटेडने राखीव फळीतून रॅशफोर्डला मैदानावर उतरवले आणि त्याने निर्णायक गोलची नोंद केली. सामन्यापूर्वी संघाच्या बैठकीला वेळेवर हजर न राहिल्यामुळे रॅशफोर्डवर युनायटेडचे प्रशिक्षक एरिक टॅन हाग यांनी कारवाई केली होती. त्यांनी रॅशफोर्डला सामन्याच्या सुरुवातीला राखीव खेळाडूंमध्ये बसवले. सामन्यानंतर रॅशफोर्डने आपली चूक मान्य केली. ‘‘मी थोडा जास्त झोपलो. त्यामुळे सामन्यापूर्वीच्या बैठकीला वेळेवर उपस्थित राहू शकलो नाही. माझ्याकडून चूक झाली. अशा गोष्टी घडू शकतात,’’ असे रॅशफोर्ड म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-01-2023 at 02:17 IST

संबंधित बातम्या