अविनाश पाटील, नाशिक

वॉटर्स एज बोट क्लब, नाशिक

आशियाई कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत दोन पदकांची कमाई.. ४०पेक्षा अधिक खेळाडूंची राष्ट्रीय स्तरापर्यंत धडक.. गोदावरी नदीला आलेल्या पुराप्रसंगी धाव घेऊन कित्येकांचे प्राण वाचविण्याची कामगिरी.. १० वर्षांपासून राज्यस्तरीय स्पर्धेत नाशिक जिल्ह्य़ास विजेतेपदाचा मान मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण सहभाग.. महाराष्ट्राच्या संघातही निम्म्यापेक्षा अधिक खेळाडू त्यांचेच.. जिथे पाण्याची सुविधा त्या ठिकाणीच खेळण्यात येत असलेला, म्हणूनच काहीसा मर्यादित असलेला खेळ म्हणजे नौकानयन अर्थात रोइंग. अनेक अडथळ्यांवर मात करून नाशिक येथील ‘वॉटर्स एज बोट क्लब’ने नौकानयनमध्ये आज आपली दखल राष्ट्रीय स्तरावर घेणे भाग पाडले आहे.

महाराष्ट्रात स्पर्धात्मकदृष्टय़ा खेळाडू तयार करणाऱ्या बोटावर मोजण्याइतक्या क्लबमध्ये वॉटर्स एज बोट क्लबचा समावेश आहे. मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेने नौकानयनचे प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर अंबादास तांबे, अनिल काकड, प्रा. हेमंत पाटील यांसह इतर खेळाडूंनी त्यात चांगली प्रगती केली. बाळासाहेब कर्डिले यांच्यासह नौकानयनचे तांत्रिक प्रशिक्षण घेतलेले गंधार मंडलिक यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. १९९८मध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर या खेळाडूंनी नौकानयनच्या प्रसारासाठी काय करता येईल, याचा विचार सुरू केला.

नदीकिनारी जमीन असलेल्या एखाद्या भल्या माणसाच्या सहकार्याने बोट क्लब सुरू करण्याचा विचार पुढे आला. त्या दृष्टीने अशा माणसाचा शोध सुरू झाला. हा शोध माजी महापौर प्रकाश मते यांच्यापर्यंत जाऊन थांबला. मते यांनी आसारामबापू आश्रमाजवळील गोदावरी नदीलगतच्या जमिनीचा त्यासाठी उपयोग करता येऊ शकेल, असे सांगितले. जागेचा प्रश्न सुटल्यावर बांधकाम, बोटी असे प्रश्नही सुटत गेले. ४ एप्रिल १९९९ रोजी वॉटर्स एज बोट क्लबचे उद्घाटन झाले. प्रारंभी तीन बोटी होत्या. आता ही संख्या १६पर्यंत पोहोचली आहे. क्लबमध्ये नौकानयन, कॅनो आणि कयाकिंग या नौकानयन खेळातील तीनही प्रकारांत खेळाडू घडवले जातात. क्लबच्या स्थापनेपासून असलेले अंबादास तांबे यांच्यासह मनीष बोरस्ते, पूजा जाधव, अविनाश देशमुख, स्मिता तांबे ही प्रशिक्षकांची फळी सकाळी सहा ते नऊ आणि दुपारी चार ते सात या वेळेत प्रशिक्षण देते. सध्या क्लबच्या खेळाडूंची संख्या ६० पर्यंत आहे. त्यात मुलींची संख्या २५ आहे. हँडल फिरवण्याइतपत (म्हणजेच वल्हविण्याइतपत) शक्ती बाहूंमध्ये असलेल्यांनाच क्लबमध्ये प्रवेश दिला जातो. वयाने तो मुलगा आठ वर्षांचा असला तरी हरकत नाही. खेळाची आवड तर आहे, परंतु पोहता न येणाऱ्यांना प्रशिक्षकांकडून पोहणेही शिकविले जाते. नाशिकच्या खेळाडूंना योग्य तऱ्हेने प्रशिक्षण दिल्यास ते नौकानयनमध्येही कशी प्रगती करू शकतात, हे क्लबने दाखवून दिले आहे. क्लबच्या प्रगतीचा आलेख त्यासाठी पुरेसा ठरावा.

जानेवारी २०१०मध्ये चेन्नईत झालेल्या आशियाई शालेय अजिंक्यपद स्पर्धेत क्लबच्या खेळाडूंनी कॉकलेस फोर आणि डबल स्कल या प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. रुपाली तांबे, शुभांगी जगझाप, प्रिया जाधव, वैशाली तांबे यांचा त्यामध्ये समावेश होता. राज्यस्तरीय कनिष्ठ आणि उपकनिष्ठ स्पर्धामध्ये तर क्लबचा कायमच दबदबा आहे. जानेवारी २०१० मध्ये पुणे येथे अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आयोजित ३२ व्या राज्यस्तरीय स्पर्धेत क्लबच्या मुलींनी १२ सुवर्ण, आठ रौप्य, सहा कांस्य अशी लयलूट करीत सर्वसाधारण विजेतेपद मिळवले होते. १० वर्षांपासून राज्यस्तरावर क्लबच्या खेळाडूंमुळे नाशिक जिल्हाच अजिंक्य आहे. महाराष्ट्राच्या संघातील निम्मे खेळाडू तर या क्लबचेच असतात. राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या संतोष कडाळेचा २०१७च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत समावेश होता. मृण्मयी साळगावकरने अलीकडेच बँकॉक येथे झालेल्या आशियाई कनिष्ठ स्पर्धेत मिक्स फोर आणि पियर्स या गटात सुवर्ण, तर सिंगल स्कलमध्ये रौप्य अशा तीन पदकांची कमाई करीत पुढचे पाऊल टाकले आहे.

क्लबची केवळ स्पर्धात्मक कामगिरीच उल्लेखनीय आहे असे नव्हे, तर सामाजिक दायित्वही त्यांनी वेळोवेळी निभावले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर २००८मध्ये गोदावरीच्या पुराने नाशिकजवळील सायखेडा, चांदोरी या गावांना वेढा दिल्यावर हादरून गेलेल्या जिल्हा प्रशासनाने क्लबची मदत मागितली. मालमोटारीतून तीन बोटींसह क्लबच्या १६ सदस्यांनी तातडीने चांदोरी गाठले. शेकडो नागरिकांना, गुरांना सुरक्षितस्थळी हलवले. सप्टेंबरच्या महापुरात क्लबच्या सदस्यांनी अग्निशामक जवानांच्या मदतीने सात जणांचे प्राण वाचवले. अग्निशामक दलाकडे बोट होती, परंतु पुरात अडकलेल्यांना कसे बाहेर काढावे, याचे प्रशिक्षणच देण्यात आले नसल्याने त्यांना क्लबचे सहाय्य घ्यावे लागले. याच महापुरात क्लबच्या काही बोटी वाहून गेल्या, तर १२ बोटींचे नुकसान झाले. याशिवाय क्लबचे अध्यक्ष विक्रांत मते यांच्या संकल्पनेतून गोदावरीतील पाणवेलींसह इतर प्रदूषण हटविण्यासाठी ‘पाण्यावरील घंटागाडी’ हा उपक्रमही खेळाडूंच्या सहाय्याने राबवला गेला.

महाराष्ट्र पोलीस नौकानयन संघाचे प्रशिक्षण शिबीरही दोन वर्षे येथे झाले. नाशिक जिल्ह्य़ातीलच दत्तू भोकनळप्रमाणे नौकानयनमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडवण्यासाठी क्लबचे पदाधिकारी आणि प्रशिक्षक प्रयत्नशील आहेत.

 

राज्य आणि राष्ट्रीय पातळीपर्यंत आमच्या खेळाडूंनी धडक दिली आहे. आता एक तरी आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करणे हे ध्येय आहे. क्लबमध्ये येणारे बहुतांश खेळाडू हे ग्रामीण भागातील असल्याने काही अडचणी येत असल्या तरी त्यांच्यावर मात करून वाटचाल करीत आहोत. या खेळात अंतिम रेषा खेळाडूंना दिसत नाही. त्यामुळे संतुलन साधत सरळ मार्गक्रमण कसे करावे, हे हा खेळ शिकवितो. नौकानयनमुळे अनेकांचा रोजगाराचा प्रश्न मिटवला आहे. आमचे किरण कोयटे, मयूर म्हसाळ हे आज पोलीस उपनिरीक्षक आहेत. काही जण पोलीस, सैन्यात आहेत.

-अंबादास तांबे, प्रशिक्षक

खेळाडूंच्या कामगिरीमुळे क्लबचे नावही उंचावत आहे. क्लबच्या अनेक खेळाडूंना विविध ठिकाणी नोकरी मिळाल्यामुळे क्रीडाप्रेम आणि त्याद्वारे रोजगाराची संधी या अर्थानेही नौकानयनकडे आता पाहिले जाऊ लागले आहे. काही वर्षांपूर्वी गोदावरीच्या महापुरात क्लबच्या सहा बोटी वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. त्यामुळे आर्थिक फटका बसला. त्यातून सावरण्यासाठी वेळ गेला, अन्यथा क्लबची आता आहे त्यापेक्षा अधिक प्रगती दिसली असती.

प्रकाश मते, वॉटर्स एज बोट क्लबचे संस्थापक-अध्यक्ष

क्लबचे शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त पंचक

अंबादास तांबे (प्रशिक्षक), वैशाली तांबे, संतोष कडाळे, पूजा जाधव, राजेंद्र सोनार