बर्मिगहॅम, एएफपी
जवळपास दीड वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या स्टीव्ह स्मिथने इंग्लंडच्या वेगवान माऱ्याचा आणि चाहत्यांच्या टोमण्यांचा सक्षमपणे मुकाबला करून अॅनशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात झुंजार शतक साकारले. त्यामुळे सुरुवातीला स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस वोक्सच्या गोलंदाजीसमोर ढेपाळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २८४ धावांपर्यंत मजल मारली.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु ब्रॉडने सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (२) आणि कॅमेरून बँक्राफ्ट (८) यांना माघारी पाठवून ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय चुकीचा ठरवला. तिसऱ्या क्रमांकावरील उस्मान ख्वाजाही (१३) फार काळ टिकू शकला नाही. एकापाठोपाठ फलंदाज बाद होत असताना स्मिथने एकाकी खिंड लढवली.
ऑस्ट्रेलियाची ८ बाद १२२ धावा अशी अवस्था असताना स्मिथने लक्ष विचलित होऊ न देता पीटर सिडलच्या (४४) साथीने नवव्या गडय़ासाठी ८८ धावांची भागीदारी रचली. सिडल बाद झाल्यानंतर स्मिथने आक्रमक पवित्रा अवलंबला. ११व्या क्रमांकावरील नॅथन लिऑनसह त्याने १०व्या गडय़ासाठी ७४ धावांची भागीदारी रचली. बेन स्टोक्सला कव्हरच्या दिशेने चौकार लगावून स्मिथने कारकीर्दीतील २४वे आणि इंग्लंडविरुद्धचे नववे कसोटी शतक साकारले. ब्रॉडने स्मिथला १४४ धावांवर बाद करून पाच बळी मिळवले आणि ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २८४ धावांत गुंडाळला. वोक्सने तीन तर स्टोक्स व मोईन अलीने प्रत्येकी एक बळी मिळवला. दिवसअखेर इंग्लंडने पहिल्या डावात २ षटकात बिनबाद १० धावा केल्या आहेत. जेसन रॉय ६ तर रॉरी बर्न्सल ४ धावांवर खेळत आहे.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ८०.४ षटकांत सर्वबाद २८४ (स्टीव्ह स्मिथ १४४, पीटर सिडल ४४; स्टुअर्ट ब्रॉड ५/८६).
इंग्लंड (पहिला डाव) : २ षटकांत बिनबाद १०