कराची : पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) आशियाई चषक स्पर्धेसंदर्भात चारपेक्षा अधिक सामन्यांच्या आयोजनाची नवी मागणी पुढे केली आहे. आशियाई क्रिकेट परिषदेची (एसीसी) आज, रविवारी दुबईत बैठक होणार असून या बैठकीत ‘पीसीबी’कडून ही मागणी ठेवण्यात येण्याची शक्यता आहे.

यंदा आशिया चषक एकदिवसीय स्पर्धा ३१ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी संमिश्र प्रारूप सर्वानुमते स्वीकारण्यात आल्यावर चार सामन्यांचे आयोजन पाकिस्तानात आणि उर्वरित नऊ सामन्यांचे आयोजन श्रीलंकेत करण्यात येईल हे निश्चित करण्यात आले होते.

दोन देशांमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारताने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्यानंतर संमिश्र प्रारूपाचा आराखडा समोर ठेवण्यात आला होता. हा आराखडा मंजूर झाल्यावरच स्पर्धेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले. आता या कार्यक्रमात फारसा बदल होऊ शकत नाही असेच मानले जात आहे. मात्र, यानंतरही ‘पीसीबी’ने श्रीलंकेत स्पर्धेच्या कालावधीदरम्यान पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे पाकिस्तानला चारपेक्षा अधिक सामने मिळावेत अशी नवी मागणी ‘पीसीबी’ने पुढे केली आहे. यामध्ये ‘पीसीबी’च्या कार्यकारी समितीचे नवे अध्यक्ष झाका अश्रफ यांनी लाहोरसह मुल्तान येथे सामने आयोजित करण्याचा आग्रह धरला असून, पाकिस्तान विरुद्ध नेपाळ हा सामना मुल्तान येथे खेळवण्यात यावा अशी त्यांची अपेक्षा असल्याचे म्हटले जात आहे.

क्रिकेटशी राजकारण जोडू नये – मिस्बाह

पाकिस्तान क्रिकेट संघाला भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत खेळण्याची परवानगी देण्यात यावी. सरकारकडून त्यांना परवानगी नाकारण्यात आली, तर तो चाहत्यांवरील अन्याय असेल, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार मिस्बाह उल हकने व्यक्त केले आहे. इतर खेळांसाठी पाकिस्तानचा संघ भारतात जाऊ शकतो, मग क्रिकेटसाठीच का नाही? क्रिकेटशी राजकारण का जोडले जाते? असा प्रश्नही मिस्बाहने उपस्थित केला आहे. भारत-पाकिस्तान यांच्यामधील क्रिकेट सामना म्हणजे चाहत्यांसाठी मोठी पर्वणी असते. ते क्रिकेटचा मनमुराद आनंद घेतात. त्यामुळे पाकिस्तान संघाला भारतात जाण्याची परवानगी नाकारल्यामुळे चाहत्यांवर अन्याय होईल, असे मिस्बाहचे म्हणणे आहे.