Srilanka vs Bangladesh Highights: आशिया चषक २०२५ स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने समाप्त झाले आहेत. सुपर ४ फेरीतील पहिला सामना श्रीलंका आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ७ गडी बाद १६८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशच्या फलंदाजांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. बांगलादेशकडून सैफ हसन – तोहीद हृदोय यांनी दमदार अर्धशतकं झळकावली. या सामन्याचा निकाल शेवटच्या षटकात लागला. हा सामना बांगलादेशने ४ गडी राखून आपल्या नावावर केला.
बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी १६९ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगलादेशला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. सलामीवीर फलंदाज तांझिद हसन शून्यावर माघारी परतला. मात्र सैफ हसन खंबीरपणे उभा राहिला. त्याने २ चौकार आणि ४ षटकारांसह ६१ धावांची खेळी केली. कर्णधार लिटन दासने २३ धावांचे योगदान दिले. शेवटी तोहीद हृदोयने अर्धशतकी खेळी केली. सैफ हसन बाद झाल्यानंतर तोहीदने श्रीलंकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. यादरम्यान शेवटचे १२ चेंडू शिल्लक असताना तो ५८ धावांवर बाद होऊन माघारी परतला.
शेवटच्या षटकात लागला निकाल
या सामन्यातील शेवटच्या षटकात बांगलादेशला विजयासाठी ५ धावा करायच्या होत्या. श्रीलंकेकडून दासून शनाका गोलंदाजीला आला. या षटकातील पहिल्याच चेंडूवर जाकेर अलीने चौकार मारून सामना बांगलादेशच्या बाजूने फिरवला. पुढील ५ चेंडूत बांगलादेशला केवळ १ धाव करायची होती. पण दासून शनाकाने यादरम्यान २ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. शेवटी पाचव्या चेंडूवर नसुम अहमदने १ धाव घेतली आणि बांगलादेशला विजय मिळवून दिला.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २० षटकांअखेर ७ गडी बाद १६८ धावा केल्या. श्रीलंकेकडून फलंदाजी करताना सलामी जोडीने ४४ धावांची दमदार सुरुवात करून दिली. पथुम निसंकाने १५ चेंडूत २२ धावा चोपल्या. तर कुसल मेंडीसने २५ चेंडूत ३४ धावांची खेळी केली. कुसल परेराने १६ धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून दासून शनाकाने सर्वाधिक ६४ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ३ चौकार आणि ६ षटकार खेचले.