Asia Cup 2025 Final Qualification Scenario: आशिया चषक २०२५ च्या अंतिम फेरीत पोहोचणारा टीम इंडिया पहिला संघ ठरला. भारताने बांगलादेशचा पराभव करत अंतिम सामन्याचं तिकीट मिळवलं. आशिया चषकात अद्याप एकही सामना न गमावलेल्या टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच आहे. भारताचा अंतिम सामना रविवारी २८ सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. पण प्रतिस्पर्धी संघ अद्याप ठरलेला नाही. पाकिस्तान किंवा बांगलादेश संघ भारताविरूद्ध अंतिम फेरीत खेळताना दिसणार आहे.

भारतीय संघाने सुपर फोरच्या गुणतालिकेत सुरूवातीचे दोन्ही सामने जिंकत ४ गुण मिळावले आहेत. भारताशिवाय फक्त एकच संघ गुणतालिकेत आता ४ गुण गाठण्यात यशस्वी ठरू शकतो. इतकंच नव्हे तर फक्त भारताला गुणतालिकेत ६ गुण गाठण्याची शक्यता आहे आणि त्यांचा नेट रन रेट पाहता टीम इंडिया पहिल्या स्थानीच राहणार आहे.

पाकिस्तान किंवा बांगलादेशचा संघ अंतिम सामन्यासाठी कसा पात्र ठरू शकतो?

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सुपर फोरमधील सामना २५ सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. या सामन्यात जो संघ विजयी ठरेल तो थेट फायनलमध्ये प्रवेश मिळवेल. कारण, श्रीलंका या स्पर्धेतून बाहेर पडली आहे. सुपर-४ फेरीत त्यांना भारत आणि पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागल्याने भारत-बांगलादेश सामन्यातील निकालानंतर त्यांची अंतिम फेरीची आशा संपुष्टात आली.

सुपर फोरमधील भारताचा अखेरचा सामना श्रीलंकेविरूद्ध होणार आहे, त्या सामन्याचा निकाल स्पर्धेवर काही परिणाम करणारा नसेल. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना गुरुवारी (२५ सप्टेंबर) होईल आणि विजेता संघ थेट फायनलमध्ये धडक मारेल. या आभासी उपांत्य सामन्यात नेट रन रेटचा काहीही संबंध राहणार नाही, कारण तीन संघांमध्ये टाय होण्याची शक्यता नसल्यामुळे फक्त गुणांवरच अंतिम फेरीतील संघ निश्चित होणार आहे.

पाकिस्तानचा संघ श्रीलंकेचा पराभव करत बांगलादेशविरूद्ध सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. तर दुसरीकडे बांगलादेशचा संघ भारताविरूद्ध पराभवानंतर सामना खेळण्यासाठी उतरेल. दोन्ही संघ हा सामना जिंकण्यासाठी अटीतटीचे प्रयत्न करताना दिसणार आहेत. बांगलादेशचा कर्णधार लिटन दास हा दुखापतीनंतर पाकिस्तानविरूद्ध सामन्यात खेळणार का यावर सर्वांच्या नजरा असतील.

भारत आणि पाकिस्तानच्या संघांमध्ये आशिया चषकाच्या इतिहासात आजवर कधीच सामना झालेला नाही. त्यामुळे भारत-पाकिस्तान अंतिम सामना झाल्यास तिसऱ्यांदा या दोन संघांमध्ये यंदाच्या स्पर्धेत लढत होताना दिसणार आहे. तर भारत आणि बांगलादेश यांच्यात २०१६ आणि २०१८ मध्ये अंतिम सामना खेळवला गेला होता.