देवेंद्र पांडे, इंडियन एक्सप्रेस

आशिया चषक २०२५ साठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली १४ खेळाडूंना संधी देण्यात आली. दरम्यान गेल्या वर्षभरात संघाचा भाग नसलेल्या शुबमन गिलला उपकर्णधारपद देण्यात आले. तर श्रेयस अय्यरला वगळल्याने संघ व्यवस्थापनावर टीका केली जात आहे. दरम्यान गिलला उपकर्णधारपद मिळाल्याने अक्षर पटेलकडून ही जबाबदारी काढून घेण्यात आली. पण बैठकीत उपकर्णधारपदाचा निर्णय कसा झाला, जाणून घेऊया इनसाईड रिपोर्ट.

भारताचा टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आता ३५ वर्षांचा होणार आहे. यामुळे भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिलचं नशीब उजळलं आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाला टी-२० मध्ये असा कर्णधार हवा आहे जो दीर्घकाळ संघाचं नेतृत्त्व करेल. आशिया चषकासाठी निवडलेल्या भारतीय संघात शुबमन गिलची उपकर्णधारपदी निवड करण्याचे हेच कारण होते.

मंगळवारी झालेल्या निवड समितीच्या बैठकीत हा मुद्दा चर्चेचा मोठा विषय होता. ऑनलाइन व्हीडिओ कॉलद्वारे सामील झालेले मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनाही असं वाटले की भारताचं भविष्यात नेतृत्त्व करण्यासाठी कोणाला तरी तयार करण्याची आवश्यकता आहे. पुढील महिन्यात २६ वर्षांचा होणारा गिल हा सर्वात योग्य उमेदवार आहे. यापूर्वी उपकर्णधारपदाची जबाबदारी अक्षर पटेलने सांभाळली होती. यशस्वी जैस्वालची देखील १५ सदस्यीय संघात निवड झाली नाही.

अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने २०२५ मध्ये पहिल्यांदाच गिलची टी-२० संघात निवड केली आहे. इंग्लंड दौऱ्यावर कसोटी कर्णधार म्हणून चमकदार कामगिरी करणारा गिल आशिया चषक स्पर्धेत प्लेइंग इलेव्हनचा भाग असू शकतो, असे संकेतही पत्रकार परिषदेत मिळाले. सूर्या आणि आगरकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की गिल नेहमीच भारतीय टी-२० संघाची पहिली पसंती राहिला आहे.

निवड समितीच्या मते, गिलला सामने काळजीपूर्वक निवडण्यास सांगण्यात आले होते. जर तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला असता आणि घरच्या मैदानावर खेळला असता तर तो संघाचा उपकर्णधार असता. इंग्लंडमध्ये त्याने धावांचा डोंगर उभारला आणि त्याच्या नेतृत्त्व कौशल्यानेही सर्वांचं लक्ष वेधलं. यामुळे त्याचा दावा अधिक मजबूत झाला.

भारताच्या टी-२० संघाचा उपकर्णधार कसा ठरला? निवड समिती बैठकीची इनसाईड स्टोरी

सुरुवातीला टी-२० संघाच्या उपकर्णधारपदासाठी गिल पहिली पसंती नव्हता आणि काहींचं असं म्हणणं होतं की अक्षर पटेलने उपकर्णधारपदी राहावे. पण निवड समितीच्या बैठकीत एकंदरित असा निष्कर्ष निघाला की अशा खेळाडूवर गुंतवणूक करणं जास्त योग्य ठरेल, जो दीर्घकाळ भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्त्व करू शकेल. पॅनेलला असा दुसरा कोणताही उमेदवार आढळला नाही, ज्याच्यावर पुढील पाच वर्षांची जबाबदारी सोपवता येईल.

गिल आधीच कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे, निवडकर्त्यांना वाटलं की भविष्यात सूर्याची जागा घेण्यासाठी त्याला तयार करण्याची हीच योग्य वेळ आहे. याचबरोबर इंग्लंडमध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या यशस्वी जैस्वालला संघातून वगळण्यात आलं आहे. गिलची निवड झाल्यानंतर, निवडकर्त्यांना आणि संघ व्यवस्थापनाला आता टॉप ऑर्डरचा विचार करावा लागेल, कारण संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी सलामी जोडी म्हणून उत्तम कामगिरी केली आहे.