Pakistan Misses Simple Run Out VIDEO: आशिया चषक २०२५ मध्ये बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात फायनलच्या दृष्टीने महत्त्वाचा सामना खेळवला जात आहे. या सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम सामन्यात भारताविरूद्ध खेळणार आहे. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करता १३५ धावा केल्या आहेत. तर प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघही पाकिस्तानच्या गोलंदाजीविरूद्ध धावा काढण्यासाठी झगडताना दिसतो आहे. पण यादरम्यान पाकिस्तानची खराब दर्जाची फिल्डिंग पुन्हा एकदा पाहायला मिळाली.

पाकिस्तानने दिलेल्या १३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने सावध सुरूवात केली. पण शाहीन आफ्रिदीच्या भेदक गोलंदाजीवर बांगलादेशच्या मोठ्या फलंदाजांनी पॉवरप्लेमध्येच विकेट गमावले. पण पाचव्या षटकात पाकिस्तानच्या सर्वात खराब फिल्डिंगचा पुन्हा एकदा नमुना पाहायला मिळाला. ज्याचे व्हीडिओ फोटो आता व्हायरल होत आहेत.

पाचव्या षटकात शाहीन शाह आफ्रिदी गोलंदाजीला आला. तौहिद ह्रदय आणि सैफ फलंदाजी करत होते. तौहिद स्ट्राईकवर होता आणि त्याने बॅकवर्ड डीपकडे चेंडू टोलवला. सईम अयूब तिथे फिल्डिंग करत होता आणि त्याने कमालीचा डाईव्ह करत चेंडू अडवला. पण तोपर्यंत याबाजूने सैफ स्ट्राईकर एन्डच्या दिशेला पोहोचला होता. ज्यामुळे सैफ धावबाद होणार हे निश्चित होतं.

सॅम अयुबने ताबडतोब चेंडू पकडला आणि गोलंदाजाच्या टोकाकडे फेकला. पण थ्रो पकडण्यासाठी तिथे कोणीही नव्हतं. दरम्यान, सैफ पुन्हा क्रीजकडे धावला आणि दुसऱ्या पाकिस्तानी क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडला आणि फेकला. पण चेंडू मात्र स्टंपपर्यंत पोहोचला नाही. तिथे तीन जण चेंडू टिपण्यासाठी पोहोचले होते. पण क्षेत्ररक्षकाकडून चेंडूचं पोहोचला नाही. सैफने जर थेट थ्रो मारला असता तर तो बाद झाला असता, पण तसं झालं नाही. पाकिस्तानी खेळाडूंचा समन्वय दिसला नाही आणि मोठी चूक झाली.

पण पुढच्याच चेंडूवर शाहीन आफ्रिदीने तौहिद ह्रदयला झेलबाद केलं. ज्यामध्ये सईम अयुबने कमालीचा झेल टिपला. बांगलादेशविरुद्ध पाकिस्तानकडून मोहम्मद हरिसने सर्वाधिक २३ चेंडूत ३१ धावा केल्या, ज्यामध्ये दोन चौकार आणि एक षटकार होता. मोहम्मद नवाजने २५ धावा केल्या. शाहीन आफ्रिदीने १९ धावांचे योगदान दिले आणि या खेळाडूंमुळेच पाकिस्तानने १३५ धावांचा सन्मानजनक आकडा गाठला.