PAK vs UAE Asia Cup 2025 Umpired Injured: हस्तांदोलन प्रकरणावरून बहिष्काराचा इशारा ते घूमजाव अशी वाटचाल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केली. हे पुरेसं नाही म्हणून मैदानावर पाकिस्तानच्या यष्टीरक्षकाच्या चुकीच्या थ्रो मुळे पंच घायाळ होण्याचा प्रकार घडला. सहाव्या षटकादरम्यान हा प्रकार घडला. फिरकीपटू सईम अय्युब गोलंदाजी करत होता. चेंडू मिडविकेटच्या दिशेने गेला. त्याने विकेटकीपरकडे सोपवला. क्षेत्ररक्षकाच्या हातात गेल्यामुळे धाव घ्यायचा प्रश्न नव्हता. पाकिस्तानचा विकेटकीपर मोहम्मद हॅरिसने चेंडू सईम अय्युबकडे सोपवला. त्याने घाईघाईत केलेला थ्रो पंच रुचिरा पल्लियागुरुगे यांच्या मानेच्या मागच्या बाजूवर जाऊन आदळला. सईमने तात्काळ रुचिरा यांची विचारपूस केली. पाकिस्तानच्या फिजिओंनी त्वरित मैदानात धाव घेत रुचिरा यांच्यावर उपचार केले. डोक्याच्या मागच्या बाजूला चेंडू लागल्याने त्यांची कॉन्कशन टेस्ट घेण्यात आली. सुदैवाने रुचिरा यांची तब्येत नीट होती. पाकिस्तानच्या सगळ्याच खेळाडूंनी रुचिरा यांची विचारपूस करण्यासाठी धाव घेतली. फिजिओंच्या सल्ल्यानुसार रुचिरा यांनी मैदान सोडले. त्यावेळी पाकिस्तानचा विकेटकीपर मोहम्मद हॅरिसने रुचिरा यांची माफी मागितली.
५७वर्षीय रुचिरा अनुभवी पंच आहेत. श्रीलंकेच्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये १२४ सामने खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे. २०११ मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय पंच म्हणून पदार्पण केलं. २०१५ तसंच २०१९ वर्ल्डकपमध्ये त्यांनी पंच म्हणून काम पाहिलं आहे. २०१६ आशिया चषकाच्या अंतिम लढतीत ते पंच होते.
रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान लढतीत भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघा यांनी नाणेफेकीच्या वेळेस हस्तांदोलन केलं नाही. सामना संपल्यानंतर भारतीय संघाने पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन नाकारलं. या प्रकारामुळे नाराज होऊन पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघा पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहिला नाही. पत्रकार परिषदेला त्याच्याऐवजी प्रशिक्षक माईक हेसन उपस्थित होते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हे प्रकरण पुढे रेटत सामनाधिकाऱ्यांना लक्ष्य केलं. पायक्रॉफ्ट यांनी हस्तांदोलन करू नका अशी सूचना दिल्याचा आरोप पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केला. पायक्रॉफ्ट यांची तातडीने हकालपट्टी करावी अशी मागणी पीसीबीने केली होती. मागणी पूर्ण न झाल्यास उर्वरित सामन्यांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा पाकिस्तानने दिला होता.
हस्तांदोलन न करण्याचा मुद्दा पेटला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी याप्रकरणी सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना लक्ष्य केलं. पायक्रॉफ्ट यांनीच कर्णधारांना हस्तांदोलन न करण्याची सूचना केली होती असा आरोप नक्वी यांनी केला. पायक्रॉफ्ट यांची तातडीने हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी आयसीसीकडे केली. मागण्या पूर्ण न झाल्यास पाकिस्तान युएईविरुद्धच्या लढतीवर बहिष्कार घालण्याचे संकेत दिले होते. मात्र आता हा सामना होत आहे.सामन्याआधी पीसीबीच्या वाटाघाटी बैठकी सुरू असल्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंनी मैदान सोडलं नव्हतं. बहिष्कार न घालण्याचा निर्णय झाल्याने पाकिस्तानचा संघ अखेर रवाना झाला. या प्रकारामुळे सामना तासभर उशिराने सुरू करण्यात आला.
अँडी पायक्रॉफ्ट यांनी आयसीसी कोणत्याही नियमाचं उल्लंघन केलेलं नाही. याउलट त्यांनी जोखमीची परिस्थिती शिताफीने हाताळली. कर्णधारांनी हस्तांदोलन करू नये असा निर्णय संयोजकांनी घेतला आहे हा मुद्दा पायक्रॉफ्ट यांनी दोन्ही संघांच्या कर्णधारांसमोर मांडला. आयत्यावेळी गोंधळ होऊ नये यासाठी पायक्रॉफ्ट यांनी दोन्ही कर्णधारांशी समन्वय साधला.
पायक्रॉफ्ट यांच्या विरोधात तक्रार करण्याचा अधिकार पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आहे. पण आयसीसीने यासंदर्भात अंतर्गत चौकशी प्रक्रिया केली असून पायक्रॉफ्ट यांनी त्यांच्या कामात कोणतीही चूक केलेली नाही तसंच नियमांचं उल्लंघन केलेलं नाही असं स्पष्टपणे नमूद केलं.
सामनाधिकारी तसंच पंचांची नियुक्ती आयसीसीतर्फे केली जाते. ही एक स्वतंत्र तटस्थ यंत्रणा आहे. पायक्रॉफ्ट यांना पदावरून दूर केल्यास चुकीचा पायंडा पडू शकतो. तसं होणं योग्य नाही असं आयसीसीने म्हटलं आहे.