India vs Pakistan, Press Conference: आशिया चषक २०२५ स्पर्धेत पुन्हा एकदा भारत – पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. साखळी फेरीत झालेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर ७ गडी राखून एकतर्फी विजयाची नोंद केली होती. आता रविवारी दोन्ही संघ सुपर ४ मध्ये भिडणार आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. या सामन्याआधी दोन्ही संघांच्या कर्णधाराची पत्रकार परिषद होणार होती. पण पाकिस्तानने या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकला. पत्रकार परिषद सुरू होण्याच्या काही तासांपूर्वी ही पत्रकार परिषद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तानने पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी यूएईविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील पाकिस्तानच्या कर्णधाराने पत्रकार परिषद रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
याआधी भारतीय संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात हस्तांदोलन न केल्याने चांगलाच वाद रंगला होता. पीसीबीने सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना स्पर्धेबाहेर करण्याची विनंती केली होती. पण आयसीसीने पीसीबीच्या विरोधात निर्णय दिला होता. त्यामुळे पीसीसीबीने यूएईविरुद्धच्या सामन्याआधीची पत्रकार परिषद रद्द केली होती.
पीसीबीने अँडी पायक्रॉफ्ट यांच्यावर गंभीर आरोप केले होते. हे आरोप आयसीसीने फेटाळून लावले. आयसीसीने स्पष्टपणे सांगितलं की, अँडी पायक्रॉफ्ट यांनी केवळ आशियाई क्रिकेट परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशाचं पालन केलं होतं आणि सामना सुरू व्हायला अवघे काही मिनिटे शिल्लक होते.
याउलट आयसीसीने पीसीबीवर खेळाडू आणि संघ व्यवस्थापकातील सदस्यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. पीसीबीने हे सर्व आरोप फेटाळून लावले. हे प्रकरण संपायच्या आधीच आता पाकिस्तानने पत्रकार परिषद रद्द करण्याचा निर्णय घेतला. माध्यमातील वृत्तानुसार, माध्यमांपासून दूर राहण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे. एकीकडे पाकिस्तानचा संघ आपल्या अडचणी वाढवत आहे. तर दुसरीकडे भारतीय संघ सुपर ४ फेरीसाठी कसून सराव करत आहे.