India vs Oman Highlights: आशिया चषकातील भारतीय संघाचा साखळी फेरीतील शेवटचा सामना ओमानविरूद्ध पार पडला. या सामन्यात नवख्या ओमानने भारतीय संघाला कडवी झुंज दिली. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करताना १८८ धावा केल्या. १८९ धावांचा पाठलाग करताना ओमानकडून २ फलंदाजांनी दमदार अर्धशतकी झळकावली. पण शेवटी भारतीय संघाने हा सामना २१ धावांनी जिंकला.

या सामन्यात भारतीय गोलंदाजांकडून हवी तशी कामगिरी पाहायला मिळाली नाही. भारतीय संघ टी-२० वर्ल्ड चॅम्पियन संघ आहे. पण ओमानच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. ओमानकडून २ फलंदाजांनी दमदार अर्धशतकं झळकावली. धावांचा पाठलाग करताना ओमानकडून आमिर कलीम आणि हमद मिर्झाने अर्धशतकी खेळी केली. या दोघांनी मिळून ९० पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली. या सामन्यात ओमानचा संघ विजयाच्या जवळ पोहोचला होता. पण शेवटी भारतीय गोलंदाजांनी आपल्या अनुभवाचा पुरेपुर फायदा घेत हा सामना आपल्या नावावर केला.

ओमानला हा सामना जिंकण्यासाठी १८९ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ओमानकडून कर्णधार जतिंदर सिंगने दमदार सुरूवात lकरून दिली. त्याने ३३ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. तर आमिर कलीम जोपर्यंक उभा होता, तोपर्यंत असं वाटत होतं की ओमानचा संघ हा सामना जिंकू शकतो. आमिरने ४६ चेंडूंचा सामना करत ६४ धावांची दमदार खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ७ चौकार आणि २ षटकार मारले. त्याला साथ देत हमद मिर्झाने ३३ चेंडूत ५१ धावांची खेळी केली.

या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार आणि २ षटकार मारले. शेवटी जितेनकुमार रामानंदीने नाबाद १२ धावांची खेळी केली. ओमानला २० षटकांअखेर १६७ धावा करता आल्या. ज्यावेळी आमिर कलीम आणि हमद मिर्झा फलंदाजी करत होते, त्यावेळी धावांची गती वाढली होती. ओमानचा संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करत होता. पण नेमकं त्याचवेळी हर्षित राणाच्या गोलंदाजीवर हार्दिक पंड्याने सीमारेषेवर अविश्वसनिय झेल घेतला. हा या सामन्यातील टर्निंग पाँईंट ठरला.

भारतीय संघाकडून फलंदाजी करताना संजू सॅमसनने सर्वाधिक ५६ धावांची खेळी केली. तर सलामीला फलंदाजीला आलेल्या अभिषेक शर्माने ३८ धावा केल्या. त्यानंतर तिलक वर्माने २९ धावा केल्या. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २० षटकांअखेर ८ गडी बाद १८८ धावा केल्या.