Asia Cup 2025 Controversy Update: आशिया चषक २०२५ स्पर्धा पार पडल्यानंतर आशियाई क्रिकेट परिषदेची बैठक घेण्यात आली. या बैठकीत बीसीसीआयने पीसीबीचे मुख्य मोहसीन नक्वी यांना चांगलंच सुनावलं आहे. मंगळवार, ३० सप्टेंबर रोजी झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत भारताने आशिया कपच्या अंतिम सामन्यानंतर झालेल्या ट्रॉफी वादावर तीव्र आक्षेप नोंदवला आणि ACC अध्यक्ष तसेच पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांना चांगलेच प्रश्न विचारले.
अंतिम सामन्यानंतर भारताने नकवी यांच्याकडून विजेतेपदाची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता, त्यानंतर नकवी यांनी ती ट्रॉफी स्वतःकडेच ठेवली. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व करताना नक्वी यांना खणखणीत प्रश्न विचारले. शुक्ला यांनी स्पष्ट केलं की ट्रॉफी ही ACC ची मालमत्ता आहे, नक्वींची वैयक्तिक नाही. तरीही नक्वी यांनी ती आपल्या हॉटेलच्या खोलीत नेली.
राजीव शुक्लांनी ACCच्या बैठकीत मोहसीन नक्वींची शाळा घेतली
शुक्ला यांनी सांगितलं की ट्रॉफी भारताला अधिकृत पद्धतीने सुपूर्द करणं आवश्यक आहे आणि ACC ने हा मुद्दा तात्काळ सोडवायला हवा. यानंतर नक्वी आणि बीसीसीआय यांच्यात मोठा वाद झाला. नकवी यांनी सांगितलं की, या संपूर्ण प्रकारात ते “एखाद्या कार्टूप्रमाणे दिसलो”. तसेच त्यांनी असा दावा केला की भारतीय संघाने लेखी स्वरूपात कुठेही दिलं नव्हतं की ते त्यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारणार नाहीत. बीसीसीआयचे प्रतिनिधी सातत्याने प्रश्न विचारत राहिले असता, नक्वी यांनी उत्तर दिले की हे मुद्दे या बैठकीत नव्हे तर वेगळ्या व्यासपीठावर चर्चिले जातील.
मोहसीन नक्वींनी भारताला आशिया चषक विजयाच्या शुभेच्छाही दिल्या नाहीत
बैठकीदरम्यान नक्वी यांनी भारताच्या विजयानंतरदेखील भारताचं अभिनंदनही केलं नाही. अखेर बीसीसीआयचे प्रतिनिधी आशिष शेलार यांनी दबाव आणल्यानंतर नक्वी यांनी अनिच्छेने भारताला विजयाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र बीसीसीआयनेआपली भूमिका ठाम ठेवत स्पष्ट केलं की विजेतेपदाची ट्रॉफी भारताकडे अधिकृतरीत्या सुपूर्द होणे आवश्यक आहे. त्यांनी हेही सांगितले की आवश्यक असल्यास बीसीसीआय प्रतिनिधी ACC च्या कार्यालयातूनही ट्रॉफी घेऊन जाऊ शकतात.
पण, नक्वी यांनी आपली भूमिका बदलण्यास नकार दिला आणि सांगितलं की या प्रकरणावर पुढे चर्चा करावी लागेल. अजूनही त्यांनी भारताला ट्रॉफी सुपूर्द करण्यास संमती दिलेली नाही, ज्यामुळे बीसीसीआय संतप्त झाले. बीसीसीआयने ठाम भूमिका घेतली की ही ट्रॉफी भारताचीच आहे आणि यावर कोणतीही चर्चा होऊ शकत नाही. बीसीसीआय आता या संपूर्ण प्रकरणाबाबत आयसीसीकडे अधिकृत तक्रार दाखल करणार आहे.