Asia Cup Super 4 Schedule: आशिया चषक २०२५ च्या सुपर फोरसाठी पात्र ठरणारा भारत हा पहिला संघ ठरला. या सुपर फोरमध्ये दोन्ही गटातून २-२ संघ पात्र ठरले आहेत आणि एकमेकांना कडवी झुंज देताना दिसतील. गट टप्प्यातील अखेरचा सामना आज भारत आणि ओमान यांच्यात खेळवला जाणार आहे. पण सुपर फोरमधील ४ संघ आधीच निश्चित झाले आहेत. आता प्रत्येक संघ कोणाविरूद्ध कधी सामना खेळणार याचं वेळापत्रक पाहूया.

आशिया चषक २०२५ साठी अ गटातून भारत व पाकिस्तान आणि ब गटातून बांगलादेश व श्रीलंका पात्र ठरले आहेत. या ४ संघांमध्ये सुपर फोरमध्ये कडवी झुंज होणार आहे. सुपर-४ मध्ये, सर्व संघ ३-३ सामने खेळणार आहेत आणि अव्वल २ संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.

सुपर फोरमधील सामने २० ते २६ सप्टेंबरदरम्यान खेळवले जातील. भारतासाठी सुपर ४ मधील ही फेरी विशेष रोमांचक असेल, कारण त्यांचा सामना पुन्हा एकदा पाकिस्तानशी होणार आहे. त्यांना बांगलादेश आणि श्रीलंका या संघांचा सामनाही करावा लागणार आहे. पाकिस्तानशी त्यांचा सामना नेहमीप्रमाणेच हाय-व्होल्टेज असण्याची अपेक्षा आहे. हँडशेक वादानंतर सुपर फोरमधील सामन्यात कसं चित्र असणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.

भारत सुपर फोर स्टेजमध्ये कोणाविरूद्ध भिडणार?

सुपर फोरचे सर्व सामने दुबई आणि अबुधाबी येथे खेळवले जातील. टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तानविरूद्ध असेल, त्यानंतर बांगलादेश आणि श्रीलंका यांच्याशी संघ भिडणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर फोरचा सामना २१ सप्टेंबर रोजी खेळवला जाईल. दोन्ही संघ दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भिडतील. त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी टीम इंडियाचा बांगलादेशविरूद्ध सामना असेल. भारतीय संघ २६ सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध सुपर फोरमधील शेवटचा सामना खेळेल.

आशिया चषक २०२५ सुपर ४ चं संपूर्ण वेळापत्रक

बांगलादेश विरुद्ध श्रीलंका, २० सप्टेंबर

भारत विरुद्ध पाकिस्तान, २१ सप्टेंबर

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, २३ सप्टेंबर

बांगलादेश विरुद्ध भारत, २४ सप्टेंबर

बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान, २५ सप्टेंबर

भारत विरुद्ध श्रीलंका, २६ सप्टेंबर