भारताने उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करीत यजमान मलेशियावर २-० अशी मात केली आणि महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेची रूबाबात उपांत्य फेरी गाठली.
पूनम राणीने ३९व्या मिनिटाला भारताचे खाते उघडले तर लिली चानू हिने ४६व्या मिनिटाला भारताचा दुसरा गोल केला. भारताने साखळी गटात सहा गुणांसह दुसरे स्थान मिळवले.  
विश्वचषक स्पर्धेत प्रवेश करण्यासाठी भारताला या स्पध्रेत जेतेपद मिळविणे आवश्यक आहे. त्यामुळेच भारताने मलेशियाविरुद्ध सावध खेळ केला. मलेशियास स्थानिक प्रेक्षकांचा पाठिंबा होता, मात्र त्याचे दडपण न घेता भारतीय खेळाडूंनी चांगल्या चाली केल्या.
राणी रामपाल हिच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या भारताला पूर्वार्धात गोल करण्यात यश मिळाले नाही. दोन्ही संघांनी पूर्वार्धात गोल करण्याच्या दोन-तीन संधी वाया घालविल्या. उत्तरार्धात सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडूंनी धारदार आक्रमण केले. त्यामध्ये सामन्याच्या ३९व्या मिनिटाला पूनम हिने सुरेख मैदानी गोल केला. या गोलमुळे भारतीय खेळाडूंच्या आक्रमणास आणखी धार आली. लिली चानू हिने त्यानंतर ७ मिनिटांनी गोल करीत भारताची बाजू बळकट केली. हा गोल झाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी बचावात्मक पवित्र्यानिशी खेळ केला. भारताने पहिल्या लढतीत हाँगकाँग संघाचा १३-० असा धुव्वा उडविला होता, मात्र दुसऱ्या लढतीत त्यांना चीनने १-० असे हरविले होते.