Asia Cup 2025 IND vs PAK Handshake Controversy: आशिया चषकात १४ सप्टेंबरला झालेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर मोठा वाद झाला. या वादामागचं कारण म्हणजे भारतीय संघाने सामन्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केलं नाही. हस्तांदोलनाचा वाद वाढला आणि पाकिस्तानी संघाने एसीसी आणि आयसीसी दोघांकडे तक्रार केली. पीसीबीनेही या घटनेसाठी सामनाधिकाऱ्यांना जबाबदार धरलं आणि सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना २०२५ च्या आशिया चषकातून तात्काळ काढून टाकण्याची मागणी केली. पण यावर आता भारताच्या माजी खेळाडूने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या मागण्या मान्य न केल्यास युएईविरूद्ध सामन्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. आयसीसी एसीसीकडे तक्रार करूनही पाकिस्तानच्या हाती मात्र निराशा लागली. आता, मोहम्मद अझरुद्दीन यांनी या वादावर एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. माजी भारतीय कर्णधार म्हणाले की हस्तांदोलन करण्यात काहीही गैर नाही आणि भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन करायला हवं होतं.
हँडशेक वादावर मोहम्मद अझरूद्दीनचं वादग्रस्त वक्तव्य
मोहम्मद अझरुद्दीन एनडीटीव्हीशी बोलताना म्हणाले, “हस्तांदोलन करण्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. जेव्हा तुम्ही सामना खेळत असता तेव्हा सामन्यासंबंधित सर्व सर्व गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत, जसं की हस्तांदोलन किंवा इतर काहीही. मला माहित नाही माहित हस्तांदोलन न करण्यामागे काय अडचण होती. मला खरंच हे समजलं नाही. पण माझ्यामते हस्तांदोलन करण्यात काही अडचण होती.”
“जेव्हा तुम्ही निषेधाच्या भावनेनं खेळत असता, तेव्हा न खेळलेलंच बरं. निषेध करून खेळण्यात काही अर्थ नाहीये. एकदा तुम्ही ठरवलंय की पाकिस्तानविरुद्ध द्विपक्षीय मालिका खेळणार नाही, पण ICC स्पर्धा किंवा आशिया चषकात खेळणार आहात, तर मग पूर्ण ताकदीनं आणि तीव्रतेनं खेळायलाच हवं.”, असं मोहम्मद अझरूद्दीन यांनी सांगितलं.
भारत-पाकिस्तान सामन्यात हस्तांदोलन मुद्द्यावरून का पेटला वाद?
१४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात गट टप्प्यातील सामना खेळवण्यात आला, ज्यामध्ये टीम इंडियाने शानदार कामगिरी केली आणि ७ विकेट्सने विजय मिळवला. सामन्यानंतर भारतीय खेळाडू थेट ड्रेसिंग रूमच्या दिशेने निघून गेले आणि पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केलं नाही. यानंतर, पाक संघाचा कर्णधार सलमान आगा सादरीकरणाला उपस्थित राहिला नाही. पाकिस्तानी संघाने भारतीय खेळाडूंच्या वर्तनाबद्दल तक्रार केली आणि कारवाईची मागणी केली.
पीसीबीने युएई विरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकीही दिली. यामुळे पाक संघाचे खेळाडू वेळेवर स्टेडियमवर पोहोचू शकले नाहीत. आयसीसीशी बैठकीत वाटाघाटी केल्यानंतर, पाकिस्तान संघ सामना खेळण्यास तयार झाला. पण सामना एक तास उशिराने सुरू झाला.