Shubman Gill Fruit Juice Seller Son Friend Strengthened His Batting: शुबमन गिल सध्या आशिया चषक २०२५ साठी दुबईमध्ये आहे. आशिया चषकातील युएईविरूद्ध पहिल्याच सामन्यात त्याने ९ चेंडूत २० धावांची नाबाद खेळी करत चांगली सुरूवात केली आहे. गिलने आपला इंग्लंड दौऱ्यावरील फॉर्म कायम राखला. दरम्यान शुबमनच्या या उत्कृष्ट फलंदाजीमध्ये त्याचा मित्र जो एका ज्युस विक्रेत्या वडिलांचा मुलगा आहे, त्याचा मोठा वाटा आहे.

शुबमन गिलचा हा मित्र आहे तरी कोण?

भारताचा कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल त्याचे वडील लखविंदर गिल यांच्यासह मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये सरावासाठी जात असे. उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यातील रहिवासी रामविलास शाह हे या स्टेडियमच्या गेट क्रमांक १ वर ज्यूस स्टॉल लावत असत. गिल आणि त्याचे वडील रोज इथे मोसंबी ज्युस पिण्यासाठी येत असत. रामविलासचा मुलगा अविनाश कुमार हा वेगवान गोलंदाज होता आणि मोहाली स्टेडियमच्या मागे असलेल्या मैदानात तो सराव करायचा.

कोण आहे अविनाश कुमार? ज्याने गिलच्या फलंदाजी कौशल्यात बजावली मोठी भूमिका

२०१४ मध्ये लखविंदर गिल यांनी अविनाशला ज्यूस विकताना पाहिलं. टाईम्स इंडियाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान अविनाशने सांगितलं की शुबमन गिलच्या वडिलांनी मला विचारलं की तू ज्यूस का विकत आहेस? यावर मी म्हणालो, मी क्रिकेट सोडलं आहे. मी एका फोटो स्टुडिओमध्ये काम करतो. माझ्या वडिलांची तब्येत ठीक नसल्याने मी आज इथे आहे.”

अविनाशची वाक्य ऐकताच लखविंदर गिल त्याच्यावर वैतागले. ते म्हणाला की क्रिकेट तुझ्या कुटुंबाचं आयुष्य बदलू शकतं. एका आठवड्यानंतर, त्यांनी अविनाशला पुन्हा दुकानात पाहिलं आणि त्याला ओरडले. यादरम्यान त्यांनी अविनाशला एका साईड-आर्म थ्रोअरचा व्हिडिओ दाखवला आणि हे प्रोफेशन म्हणून स्वीकारत त्याला सराव सुरू करण्यास सांगितलं.

गिलच्या वडिलांच्या सल्ल्यामुळे सावरलं ज्युस विक्रेत्याच्या मुलाचं आयुष्य

शुबमन गिलच्या वडिलांच्या सल्ल्यानुसार अविनाशने साईड-आर्म थ्रोअरचा सराव करायला सुरुवात केली. यादरम्यान त्याची शुबमन गिलशी मैत्री झाली. अविनाशने पुढे सांगितलं, “मी त्याला अकादमीपासून ओळखत होतो, पण आता मी त्याचा वैयक्तिक साइड-आर्म थ्रोअर झालो आहे. तो दिवस होता आणि आजचा दिवस आहे. आता आम्ही एकत्र टीम आहोत.”

अविनाश सांगतो की तो दररोज सुमारे १५० ते २०० रुपये कमवत असे, पण शुबमन किंवा त्याच्या वडिलांकडून त्याने कधीही एक पैसाही घेतला नाही. कारण शुबमनचे बाबांनी त्याला मार्गदर्शन केलं होतं. “होळी आणि दिवाळीसारख्या सणांना ते मला भेटवस्तू द्यायचे. गरज पडल्यास ते माझ्या कुटुंबालाही मदत करायचे. मी नेहमीच त्याचा ऋणी राहीन”, असं अविनाशने सांगितलं.

२०१९ मध्ये, अविनाश पंजाब रणजी संघासाठी साईड-आर्म थ्रोअर बनला आणि मनदीप सिंग आणि गुरकीरत मान सारख्या वरिष्ठ खेळाडूंनीही त्याच्या कामगिरीची वाहवा केली. याशिवाय, त्याला शुबमन गिल, अभिषेक शर्मा, प्रभसिमरन सिंग आणि अनमोलप्रीत सिंग सारख्या तरुण खेळाडूंशी चांगली मैत्री झाली. २०२४ मध्ये शुभमन गिल गुजरात सुपर टायटन्सचा कर्णधार बनला.

अविनाशने सांगितलं की, मी त्याला म्हणालो, “यार आता तू संघाचा कर्णधार झाला आहे, मला पण आयपीएलमध्ये घेऊन चल”. शुबमनच्या आश्वासक शब्दांनी त्याला आशा दिली. शुबमन त्याला म्हणाला, “तू चिंता करू नकोस.”

अविनाशने मुलाखतीदरम्यान सांगितलं की, या वर्षाच्या सुरुवातीला मी माझ्या मुलासह चंदीगडमध्ये खेळत होतो. त्यानंतर मला शुबमनचा फोन आला. फोनवर शुबमनने मला बॅग भरून तयारीत राहण्यास सांगितलं. कारण मला लवकरच गुजरात टायटन्स व्यवस्थापनाकडून फोन येणार होता. त्याने मला स्पाइक्स, कपडे, मोबाईल भेट दिलं पण हे काहीतरी वेगळंच होतं. माझ्यासाठी ती खूप अमूल्य गोष्ट होती.

आयपीएल २०२५ च्या आधीही, शुबमनचं लक्ष इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेवर होते. त्याचा मार्गदर्शक आणि बालपणीचा मित्र खुशप्रीत सिंग औलखसह, त्याला अशा व्यक्तीची देखील आवश्यकता होती जो त्याला लाल चेंडूने आव्हानात्मक गोलंदाजी करू शकेल.

अविनाशने सांगितलं की ही कल्पना केपी पाजीची होती. त्यांनी आयपीएल दरम्यान शुबमनला लाल चेंडूने सराव करण्यास सांगितले होते. जेव्हा मी गुजरात टायटन्समध्ये सामील झालो तेव्हा शुबमनने मला नेटमध्ये लाल चेंडूने गोलंदाजी करण्यास सांगितले. मी त्याला लाल चेंडूने गोलंदाजी केली आणि ज्याचा फायदा त्याला इंग्लंड दौऱ्यावर झाला.

अविनाश म्हणाला, शुबमन गिलने खूप मेहनत घेतलीये. गोलंदाजी करताना खूपदा त्याला चेंडू लागला आहे, जखमा झाल्यात पण त्याने कधीच तक्रार केली नाही. त्याचे वडिल आणि नंतर केपी पाजी यांनी आज जो शुबमन गिल आहे त्याला घडवलंय. मी फक्त त्याला गोलंदाजी केली आणि त्याची फटकेबाजीत मदत केली. त्याच्या वडिलांनी माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी जे केलंय, त्यासाठी मी आयुष्यभर त्यांचा ऋणी असेन.