Asia Cup 2025 India Jersey Revealed: आशिया चषक २०२५ साठी सर्व संघ जोरदार सराव करत आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व ८ संघांनी आपले स्क्वॉड जाहीर केले आहेत. भारतीय संघाचं नेतृत्त्व सूर्यकुमार यादव करणार आहे, तर उपकर्णधार शुबमन गिल असेल. पण यादरम्यान भारताची जर्सी कशी असणार याची सर्वांनाच उत्सुकता होती, पण आता नव्या जर्सीची झलक पाहायला मिळत आहे.
२०२५ च्या आशिया चषकासाठी टीम इंडियाची जर्सी कशी असेल हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता होती. या उत्सुकतेचे कारण म्हणजे भारत सरकारने रिअल मनी ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे, बीसीसीआय आणि टीम इंडियाचे जर्सी प्रायोजक ड्रीम ११ यांच्यातील करार मोडला गेला.
तेव्हापासून आशिया चषकासाठी टीम इंडियाच्या जर्सीवर प्रायोजकाचे नाव असेल की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता या प्रश्नाचं उत्तरही सापडलं आहे, कारण टीम इंडियाच्या जर्सीची पहिली झलक समोर आली आहे.
आशिया चषकासाठी भारताच्या जर्सीचा पहिला फोटो समोर
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेने आशिया चषकासाठीच्या फोटोशूटचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये तो टी-२० आशिया चषकासाठीची जर्सी घातलेला दिसत आहे. ही जर्सी तीच आहे जी टीम इंडियाने गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात घातली होती. प्रायोजकांशिवाय असलेल्या भारताच्या या जर्सीवर बीसीसीआयचा लोगो, आशिया चषक २०२५ चा लोगो आणि भारताचं नाव आहे.
२३ वर्षांनंतर पहिल्यांदाच टीम इंडिया कोणत्याही जर्सी प्रायोजकाशिवाय स्पर्धेत प्रवेश करणार आहे. यापूर्वी २००२ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही एका वादामुळे भारतीय संघ कोणत्याही प्रायोजकाशिवाय सहभागी झाला होता.
आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नवीन प्रायोजकांसाठी निविदा सादर करण्याची शेवटची तारीख १६ सप्टेंबर निश्चित केली आहे. बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे की कोणतीही बोली लावणारी कंपनी किंवा तिच्याशी संबंधित संस्था ऑनलाइन मनी गेमिंग, बेटिंग किंवा जुगाराशी कोणत्याही प्रकारे संबंधित नसावी.
आशिया चषक २०२५ चे यजमानपद भारताकडे आहे. परंतु भारत आणि पाकिस्तानमधील सध्याच्या तणावापूर्ण परिस्थितीमुळे, ते तटस्थ ठिकाणी (UAE) आयोजित केले जाईल. भारतीय संघाला टी-२० आशिया कप २०२५ साठी अ गटात स्थान मिळाले आहे. भारताव्यतिरिक्त, पाकिस्तान, यूएई आणि ओमान या संघांचाही यामध्ये समावेश आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना १० सप्टेंबर रोजी यूएई विरुद्ध खेळेल.
आशिया चषक २०२५ साठी भारतीय संघ
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग.