UAE Announces Squad for Asia Cup 2025: आशिया चषक २०२५ येत्या ९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, यावेळी ही स्पर्धा टी-२० स्वरूपात खेळवली जाईल. यावेळी एकूण ८ संघ आशिया चषकात खेळताना दिसणार आहेत. या ८ संघांची विभागणी दोन गटांमध्ये केली जात आहे. आता युएईच्या संघाने आपला संघ जाहीर केला आहे. ज्यामध्ये अनेक भारतीय वंशाचे खेळाडूदेखील आहेत. आणि पाकिस्तानी वंशाच्या खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे.

युएईच्या संघात १७ खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी मोहम्मद वसीमच्या खांद्यावर दिली आहे. मोहम्मद वसीम हा पाकिस्तानचा खेळाडू आहे. तर भारतीय वंशाचे ४-५ खेळाडू संघात आहेत.

युएईने आशिया चषकामध्ये जाहीर केलेल्या संघामध्ये वेगवान गोलंदाज मतिउल्लाह खान आणि डावखुरा फिरकी गोलंदाज सिमरनजीत सिंग या दोन खेळाडूंचे पुनरागमन झालं आहे. या दोन्ही खेळाडूंना यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले नव्हते, परंतु या दोन्ही खेळाडूंची आशिया चषकासाठी निवड झाली आहे. युएई संघ ९ वर्षांनंतर आशिया चषकामध्ये सहभागी होणार आहे.

घरच्या मैदानावर खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत, यूएईला त्यांच्या खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल, ज्यामध्ये बहुतेकांच्या नजरा गोलंदाजीत जुनैद सिद्दीकीवर असतील. यूएई संघ भारत, पाकिस्तान आणि ओमानसह अ गटात आहे, ज्यामध्ये त्यांना त्यांचा पहिला सामना १० सप्टेंबर रोजी दुबईच्या मैदानावर भारतीय संघाविरुद्ध खेळायचा आहे.

यानंतर, यूएई संघ १५ सप्टेंबर रोजी दुसऱ्या सामन्यात ओमान संघाविरूद्ध भिडताना दिसणार आहे, तर गट टप्प्यातील त्यांचा शेवटचा सामना १७ सप्टेंबर रोजी पाकिस्तान संघाविरुद्ध असेल.

युएईच्या संघात भारतीय वंशाचे खेळाडू

युएईच्या संघात भारतीय वंशाचे काही खेळाडू आहेत. यामध्ये हर्षित कौशिक, सिमरनजीत सिंग, ध्रुव पराशर, आर्यंश शर्मा, अलिशन शरफु हे खेळाडू भारतीय वंशाचे आहेत. ध्रुव पराशर याचा जन्म पुण्यातील आहे, तर अलिशन शरफु याचा जन्म तिरूवअनंतपुरम येथील आहे.

आशिया चषक २०२५ मधील युएईचा संघ

मोहम्मद वसीम (कर्णधार), आलिशान शरफू, आर्यंश शर्मा (यष्टीरक्षक), आसिफ खान, ध्रुव पराशर, एथन डिसोझा, हैदर अली, हर्षित कौशिक, जुनैद सिद्दीकी, मतिउल्ला खान, मोहम्मद फारूख, मोहम्मद जवादुल्ला, मोहम्मद जोहेब, राहुल चोप्रा (यष्टीरक्षक), रोहिद खान, सिमरनजीन सिंग, सगीर खान