दिव्याला सुवर्ण, रौनकला रौप्य तर मृदलला कांस्यपदक
गेल्या चार-पाच वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने चमकदार कामगिरी करणाऱ्या नागपूरच्या युवा बुद्धिबळपटूंनी पुन्हा सातासमुद्रपार तिरंगा फडकवला. मंगोलियातील अलानबटर येथे सुरू असलेल्या आशियाई युवा बुद्धिबळ स्पध्रेतील ब्लिट्झ प्रकारात दिव्या देशमुखने सुवर्णपदक, रौनक साधवानीने रौप्यपदक, तर मुदूल डेहनकरने ब्रॉन्झपदक जिंकले. दिव्याने रॅपिड प्रकारातही रौप्यपदकाची कमाई केली.
भारतात सर्वात कमी वयात ‘महिला फिडे मास्टर’हा प्रतिष्ठेचा किताब पटकावणाऱ्या दिव्याने १२ वर्षांखालील मुलींच्या गटात सातपकी सर्वाधिक सहा गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले, तर याच गटात महिला कँडिडेट मास्टर मृदूलने साडेपाच गुणांसह कांस्यपदकावर आपले नाव कोरले. मुलांच्या गटात चेस मास्टर रौनकने सातपकी साडेपाच गुण पटकावून भारताला रौप्यपदक मिळवून दिले. वर्ल्ड युथ चॅम्पियन असलेल्या दहा वर्षीय दिव्याने मंगोलियाच्या खोंगोरझूल बायरसखानला पराभूत करून विजयी सुरुवात केली. त्यानंतर तिने श्रीलंकेच्या सांदीपनी थारूशीला, मंगोलियाच्या अलतनबुया बोडबटर आणि कझाकिस्तानच्या नूरगली नाझेकेंला नमवून लागोपाठ चौथा विजय नोंदवला. त्यानंतरच्या दोन फेऱ्यांमध्ये दिव्याला मंगोलियाच्या मुगुन्झूल बात एर्दनि आणि व्हिएतनामच्या बुग क्विन्ह आन्हविरुद्ध बरोबरीवर समाधन मानावे लागले. मात्र, निर्णायक ठरलेल्या सातव्या व शेवटच्या फेरीत दिव्याने सेब्ट रसूल सयद सेतारेला दणका देत सुवर्णपदकाला गवसणी घातली. दिव्याने स्पध्रेत एकही सामना गमावला नाही, हे विशेष.
कांस्यपदकविजेत्या मृदूलने सातपकी पाच सामने जिंकले. त्यानंतर झालेल्या रॅपिड प्रकारात दिव्याने चमकदार कामगिरी करून रौप्यपदक मिळविले. तिने या प्रकारात सातपकी सहा गुण पटकाविले. दुसऱ्या व तिसऱ्या लढतीत मंगोलियाच्या सोलोमन बँबात्सेत्सेग व अनुजिन डेलगरसयानला पराभूत करून जोरदार पुनरागमन केले.
चौथ्या फेरीत उदवल बातखिशिगकडून तिला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. मृदूलने त्यानंतर शेवटच्या तीन सामन्यांमध्ये श्रीलंकेची कोडिकरा सचिंथा, मंगोलियाची अलतन्मुतुया बोल्डबटर आणि मुगुनझुल बात एर्दनिला नमवून कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केले.
१२ वर्षांखालील मुलांच्या गटात मंगोलियाच्या स्टालबेकेव्ह कांतेमिरला नमवून विजयी सुरुवात करणाऱ्या रौनकने दुसऱ्या सामन्यात कझाकस्तानच्या तेगिस त्योग ओचिरला व तिसऱ्या सामन्यात व्हिएतनामच्या ग्युयेन हूईन मिन्हा थिनला पराभूत केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Asian chess divya is asian blitz champion
First published on: 13-04-2016 at 06:33 IST