१८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये गुरुवारी धक्कादायक निकालाची नोंद झाली. सातवेळा सुवर्णपदक विजेत्या भारतीय कबड्डी संघाला इराणने पराभवाचा धक्का दिला. भारतीय संघाचा माजी कर्णधार अनुप कुमारलाही या पराभवाचा धक्का बसला आहे. या पराभवाचे दूरगामी परिणाम येत्या काळात जाणवतील असं मत अनुपने व्यक्त केलं आहे. इराणविरुद्ध झालेल्या पराभवामुळे १९९० नंतर भारत पहिल्यांदाच सुवर्णपदकासाठीच्या सामन्यात खेळणार नाहीये.

“भारताचा पराभव पाहून मला धक्काच बसला. यातून सावरण्यासाठी मला काही दिवस लागतील. या पराभवाचे आगामी काळात दूरगामी परिणाम होतील आणि ते भारताच्या हिताचे नसतील.” पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत अनुप कुमारने आपलं मत मांडलं. २०१४ एशियाडमध्ये भारताने इराणवर अंतिम फेरीत अटीतटीच्या लढतीत मात केली होती. अनुप कुमारकडे त्यावेळी भारतीय संघाचं नेतृत्व होतं.

उपांत्य फेरीत भारताने इराणला कमी लेखलं का असं विचारलं असतान अनुपने स्पष्टपणे नाही असं उत्तर दिलं. “इराणला हलकं लेखण्याची चूक भारतीय संघ कधीही करणार नाही. मात्र ज्या पद्धतीने इराणचा संघ तयारीनिशी मैदानात उतरला होता, आपण त्या बाबतीत थोडे कमी पडलो. २०२२ साली आशियाई खेळांपर्यंत आताच्या संघातील एकही खेळाडू तुम्हाला भारतीय संघात दिसणार नाही. त्यामुळे भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे.”

दुसऱ्या सत्रात कर्णधार अजय ठाकूरला झालेली दुखापत हा माझ्यादृष्टीने सामन्याला कलाटणी देणारा क्षण ठरला. ज्यावेळी तुमचा कर्णधार दुखापतग्रस्त होऊन बाहेर जातो, त्याचा तुमचा संघावर परिणाम होतो. सामन्यादरम्यान प्रशिक्षक तुमची काहीही मदत करु शकत नाही. तो मधल्या वेळेत तुम्हाला सल्ला देईल. त्यातच प्रो-कबड्डीमुळे इराणसह अन्य देशातील खेळाडूंना कबड्डीचे बारकावे आता समजायला लागले आहेत. त्यामुळे या पराभवानंतर भारताने नव्याने सुरुवात करणं गरजेचं असल्याचंही अनुप म्हणाला.