रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने केलेल्या धडाकेबाज खेळीमुळे भारताने अटीतटीच्या लढतीत हाँगकाँगवर ३-२ ने मात केली. मलेशियाच्या अलोर सेतार शहरात सुरु असलेल्या आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताने पहिला विजय मिळवला. सायना नेहवालने अंतिम क्षणी या स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर सिंधूकडे भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं होतं.

पहिल्या एकेरी सामन्यात खेळताना हाँग काँगच्या यिप प्युई यीनवर सिंधूने दोन सेट्समध्ये २१-१२, २१-१८ असा विजय मिळवला. यानंतर आश्विनी पोनाप्पा आणि प्राजक्ता सावंत या जोडीला दुहेरी सामन्यात नू विंग यंग आणि येऊंग न्गा टिंग या जोडीकडून २२-२०, २०-२२, १०-२१ असा पराभव स्विकारावा लागला. यानंतर कृष्णप्रियाचं आव्हानंही चेऊंग यिंग मी या खेळाडूने १९-२१, २१-१८, २०-२२ असं परतवून लावलं. या पराभवामुळे चांगली सुरुवात करुनही भारतीय संघ १-२ असा पिछाडीवर पडला.

अवश्य वाचा – राष्ट्रकुल स्पर्धा २०१८ – भारतीय बॅडमिंटनपटूंसमोर साखळी फेरीत सोपं आव्हान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर कर्णधार सिंधूने दुहेरी सामन्यात सिकी रेड्डीसोबत मैदानात उतरत हाँगकाँगच्या विरोधी जोडीचा २१-१५, १५-२१, २१-१४ असा धुव्वा उडवत सामन्यात बरोबरी साधली. यानंतर तिसऱ्या एकेरी सामन्यात ऋत्विका गड्डेने पिछाडी भरुन काढत येऊंग सम यीचा १६-२१, २१-१६, २१-१३ असा धुव्वा उडवत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. आगामी उबर चषक स्पर्धेसाठी आशियाई बॅडमिंटन स्पर्धा ही महत्वाची मानली जाते. या स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत पोहचणाऱ्या संघाला उबर चषकात प्रवेश दिला जातो. गुरुवारी भारताची लढत जपानविरुद्ध होणार आहे.