वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या जीवाला धोका असल्याची माहिती रविवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) मिळाली होती. एका ई-मेलद्वारे मिळालेल्या धमकीनंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाची सुरक्षा वाढवण्यात आल्याचे वृत्त होते. यासंदर्भात आता दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) एका तरुणाला आसाममधून अटक केली आहे. याच युवकाने बीसीसीआयला हा मेल पाठल्याच्याचा खुलासा एटीएसने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संघाच्या जीवला धोका असल्याचा ई-मेल पाठवणारा तरुण हा आसाममधील मोरेगाव येथील धरमतुल परिसरातील असल्याचं स्पष्ट झालं असून या प्रकरणात एटीएसने ताब्यात घेतलं आहे. मेल पाठवणाऱ्या या तरुणाने नाव ब्रजमोहन दास असे आहे. त्याचे मानसिक संतूलन बिघडल्याची माहिती त्याची आई आणि शेजाऱ्यांनी दिली असून त्यामधूनच त्याने हा ई-मेल पाठवल्याचे त्यांनी म्हटले आहे. दहशतवादाविरुद्ध सरकारने कारवाई केली नाही तर आपण भारतीय संघाला नुकसान पोहचवू, अशा आशयाचा मजकूर असलेला ई-मेल ब्रजमोहनने बीसीसीआयला पाठवला होता. हा मेल मिळाल्यानंतर बीसीसीआयने भारतीय संघाच्या सुरक्षेचा आढावा घेत सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. तसेच या ई-मेलसंदर्भात मुंबई पोलिसांकडे औपचारिक तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता हे प्रकरण दहशतवादी विरोधी पथकाकडे सोपवण्यात आले.

सायबर गुन्हे तज्ञांच्या मदतीने हा ई-मेल कुठून आला आहे याची माहिती शोधून काढली. त्यानंतर एटीएसने आसाममधील जगीरोड पोलिसांच्या मदतीने या युवकाला शोधून काढले आणि त्याला अटक केली. या तरुणाची चौकशी केली असता हा ई-मेल खोटा असल्याची माहिती समोर आली. या तरुणाला एटीएसने ताब्यात घेतले असून त्याला मुंबईत आणून त्याची सखोल चौकशी केली जाणार आहे. हा ई-मेल आपण केवळ बीसीसीआयला पाठवला होता. त्यामध्ये कोणत्याही क्रिकेटपटूचा समावेश नव्हता असं या तरुणाने स्पष्ट केलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assam mumbai ats arrest one for threatening team india player scsg
First published on: 22-08-2019 at 16:29 IST