जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या राफेल नदालने आपली हुकूमत पुन्हा एकदा सिद्ध केली. राफेल नदाल आणि डेव्हिड फेरर दोघेही स्पेनचे. एकमेकांचे जिवलग मित्र, परंतु टेनिस कोर्टवर उतरल्यानंतर कट्टर प्रतिस्पर्धी. तीन दिवसांपूर्वी झालेल्या पॅरिस मास्टर्स स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत फेररने नदालवर सनसनाटी विजय मिळवला होता. गेली अनेक वर्ष टेनिस वर्तुळात असूनही फेरर अद्यापही पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅम चषकाच्या प्रतीक्षेत आहे. या पाश्र्वभूमीवर क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या फेररचा विजय त्याच्याविषयीच्या अपेक्षा वाढवणारा होता. टेनिस विश्वातील अव्वल आठ खेळाडूंनाच संधी मिळते अशा एटीपी वर्ल्ड टूर फायनल्समध्येही फेररचा दबदबा राहणार अशी चर्चा रंगू लागली होती. मात्र राफेल नदालने खेळावरचे आपले प्रभुत्त्व सप्रमाण सिद्ध केले आणि तेही केवळ तीन दिवसात. एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेत सलामीच्या लढतीतच नदालने फेररचा ६-३, ६-२ असा धुव्वा उडवत पराभवाची परतफेड केली. या विजयासह ‘अ’ गटात नदालने स्वित्र्झलडच्या स्टॅनिसलॉस वॉवरिन्कासह अव्वल स्थान गाठले आहे. या स्पर्धेत आणखी एक विजय मिळवल्यास २०१३ वर्षअखेरीस एटीपी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखण्याची संधी नदालला आहे. दरम्यान अन्य लढतीत वॉवरिन्काने पाचव्या मानांकित चेक प्रजासत्ताकच्या टॉमस बर्डीचवर ६-३, ६-७, ६-३ अशी मात केली. या दोघांमधील लढतींमध्ये वॉवरिन्का ७-५ असा आघाडीवर होता. शेवटच्या दोन लढतींमध्येही वॉवरिन्काने बाजी मारली होती. मात्र दुसऱ्या सेटमध्ये त्याचा सूर हरपला आणि बर्डीचने दुसरा सेट जिंकत बरोबरी केली. तिसऱ्या सेटमध्ये वॉवरिन्काने आक्रमक खेळ करत बर्डीचचे आव्हान संपुष्टात आणले.
संग्रहित लेख, दिनांक 6th Nov 2013 रोजी प्रकाशित
परतफेड! नदालची फेररवर मात
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या राफेल नदालने आपली हुकूमत पुन्हा एकदा सिद्ध केली. राफेल नदाल आणि डेव्हिड
First published on: 06-11-2013 at 05:46 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Atp world finals rafael nadal eases past david ferrer