AUS vs PAK Test Series, Steve Smith: ऑस्ट्रेलियन क्रिकेट सध्या चर्चेचा विषय बनले आहे. संघाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने डेव्हिड वॉर्नरवर केलेल्या आरोपानंतर सातत्याने अनेक खुलासे होत आहेत. पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका ही वॉर्नरची शेवटची कसोटी मालिका असेल. यानंतर तो मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्येच खेळताना दिसणार आहे. दरम्यान, ३४ वर्षीय स्टीव्ह स्मिथची ही शेवटची कसोटी मालिका देखील असू शकते, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर आले आहे. मात्र, स्मिथच्या व्यवस्थापकाने या माहितीचे खंडन केले आहे. स्मिथ कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार नसल्याचे त्याच्या व्यवस्थापकाचे म्हणणे आहे.

स्टीव्ह स्मिथला अजूनही कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियन संघाबरोबरआपली काही उद्दिष्टे पूर्ण करायची आहेत आणि तो या फॉरमॅटमध्ये १०,००० धावा पूर्ण करण्याच्या अगदी जवळ आहे. वृत्तानुसार, स्मिथला २०२४ मध्ये वेस्ट इंडिज-यूएसए यांच्या संयुक्त विद्यमाने होणार्‍या टी-२० विश्वचषकात खेळायचे आहे. ही स्पर्धा जूनमध्ये खेळवली जाणार आहे. याशिवाय त्याला २०२४ मध्ये भारताविरुद्ध कसोटी मालिकाही खेळायची आहे.

हेही वाचा: विश्लेषण: मिचेल जॉन्सन वि. डेव्हिड वॉर्नर… ऑस्ट्रेलियाच्याच दोन आजीमाजी क्रिकेटपटूंमध्ये कशावरून वाद?

स्टीव्ह स्मिथचे व्यवस्थापक वॉरन क्रेग यांनी सिडनी मॉर्निंग हेराल्डला सांगितले की, “मी तुम्हाला आत्ता एवढेच सांगू शकतो की तो अजून निवृत्त होत नाहीये. त्याला अजूनही ऑस्ट्रेलियन संघासाठी खूप काही साध्य करायचे आहे.” स्मिथने आतापर्यंत १०२ कसोटी, १५५ वन डे आणि ६५ टी-२० सामने खेळले आहेत. त्याच्या कसोटीत ५८.६२ च्या सरासरीने ९३२० धावा आहेत. यामध्ये ३२ शतके आणि ३९ अर्धशतके आहेत. स्मिथने १५५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४३.५४ च्या सरासरीने ५३५६ धावा केल्या आहेत. यामध्ये १२ शतके आणि ३२ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्या नावावर टी-२० मध्ये १०७९ धावा आहेत. यामध्ये पाच अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय स्मिथने १०३ सामन्यात १२८.०९च्या स्ट्राईक रेटने २४८५ धावा केल्या आहेत.

हेही वाचा: IND vs SA: टीम इंडियाच्या ‘या’ पाच युवा खेळाडूंवर असणार लक्ष, कोणते आहेत ते खेळाडू? जाणून घ्या

यापूर्वी वॉर्नरने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती घेणार असल्याचे जाहीर केले होते. उभय संघांमधील पहिली कसोटी १४ डिसेंबरपासून पर्थ येथे खेळवली जाणार आहे. दुसरी कसोटी २६ डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये तर तिसरी कसोटी ३ जानेवारीपासून सिडनीमध्ये खेळवली जाणार आहे. वॉर्नरबाबत अलीकडेच मिचेल जॉन्सनकडून त्याच्या फेअरवेल मालिकेत निवड करण्याबाबत काही प्रश्न उपस्थित केले होते. खराब फॉर्ममध्ये असूनही निवडकर्त्यांनी वॉर्नरचा कसोटी संघात समावेश केल्याचे, जॉन्सनने म्हटले होते. त्याने टीका करताना म्हटले होते की, “सँडपेपरगेट घोटाळ्यासारख्या वादात अडकूनही क्रिकेट ऑस्ट्रेलिया वॉर्नरला निरोप देत आहे. संघाची निवड प्रतिभेच्या आधारावर होत नसून मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेली यांच्या खास मर्जीतल्या लोकांच्या आधारावर केली जात आहे.” जरी पाकिस्तान या मालिकेत दोन कसोटी सामने खेळणार असली तरी, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे.

Story img Loader