Australia vs South Africa, World Test Championship Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंकडून दमदार खेळ पाहायला मिळाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०७ धावांवर आटोपला आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धा जिंकण्यासाठी २८२ धावांची गरज आहे.
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०२ धावांवर आटोपला
या सामन्यातील दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ ७३ धावांची आघाडी घेऊन मैदानात उतरला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे मोठी धावसंख्या उभारून दक्षिण आफ्रिकेसमोर जिंकण्यासाठी मोठं आव्हान देण्याची संधी होती. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करताना अॅलेक्स कॅरी आणि मिचेल स्टार्कला वगळलं, तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आलेली नाही. सलामीला फलंदाजीला आलेल्या मार्नस लाबुशेनने २२ धावांची खेळी केली. तर पहिल्या डावात शून्यावर माघारी परतलेला उस्मान ख्वाजा दुसऱ्या डावातही स्वस्तात माघारी परतला.
तो ६ धावांवर माघारी परतला. तर कॅमरून ग्रीन शून्यावर माघारी परतला. संघातील प्रमुख फलंदाज स्टीव्ह स्मिथ अवघ्या १३ धावा करत माघारी परतला. ट्रॅव्हिस हेडला अवघ्या ९ धावा करता आल्या. पहिल्या डावात शानदार फलंदाजी करणाऱ्या ब्यू वेबस्टरने दुसऱ्या डावात अवघ्या ९ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात अॅलेक्स कॅरी सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. त्याने ४३ धावांची खेळी केली. कॅरीने मिचेल स्टार्कसोबत मिळून शानदार अर्धशतकी भागीदारी केली. या भागीदारीच्या बळावर त्याने संघाची धावसंख्या १०० पार पोहोचवली. शेवटी मिचेल स्टार्कने ५८ आणि जोश हेजलवूडने १७ धावांची खेळी केली. दोघांनी महत्वपूर्ण भागीदारी करत संघाची धावसंख्या २०७ धावांपर्यंत पोहोचवली.
दक्षिण आफ्रिकेचा डाव १३८ धावांवर आटोपला
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २१२ धावांवर आटोपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज फलंदाजीसाठी आले. दक्षिण आफ्रिकेकडे या डावात मोठी आघाडी घेण्याची संधी होती. मात्र, दक्षिण आफ्रिकेचे फलंदाजही स्वस्तात माघारी परतले. दक्षिण आफ्रिकेकडून एडेन मार्करम आणि रियान रिकल्टनची जोडी मैदानावर आली. मात्र, या जोडीला हवी तशी सुरूवात करता आली नाही. मार्करम शून्यावर माघारी परतला. तर रिकल्टन १६ धावांवर माघारी परतला. मुल्डरने ६ धावांची खेळी केली. तर टेंबा बावुमाने ३६ धावांची खेळी केली. बेडिंघम हा पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. त्याने ४५ धावांची खेळी केली.
दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २८२ धावांची गरज
हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला २८२ धावांची गरज आहे. दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकायचा असेल, तर टॉप ऑर्डरच्या फलंदाजांनी चांगली सुरूवात करून देणं गरजेचं असणार आहे. खेळपट्टी पाहता, सुरूवातीचे २ दिवस गोलंदाजांना मदत मिळत होती. पण, तिसऱ्या दिवशी गोलंदाजांना कमी मदत मिळत आहे. ही दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना दिलासा देणारी बातमी आहे.