AUS vs SA, WTC Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामन्याला सुरूवात झाली आहे. यावेळी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. या महत्वाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवत ऑस्ट्रेलियाला एका पाठोपाठ एक मोठे धक्के दिले आहेत. दरम्यान या सामन्यासाठी मैदानात उतरताच स्टीव्ह स्मिथच्या नावावर मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.
स्टीव्ह स्मिथची रिकी पाँटींगच्या रेकॉर्डशी बरोबरी
स्टीव्ह स्मिथ हा ऑस्ट्रेलियन संघातील सर्वात अनुभवी आणि प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील अंतिम फेरीत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. अंतिम सामन्यासाठी मैदानात येताच स्मिथच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. याआधी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगच्या नावे सर्वाधिक वेळेस आयसीसीच्या अंतिम सामन्यात खेळण्याचा रेकॉर्ड होता. त्याने ६ वेळेस आयसीसीच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व केलं होतं. आता स्टीव्ह स्मिथ देखील आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील आयसीसीचा सहावा अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. यासह त्याने रिकी पाँटींगच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे. या यादीत श्रीलंकेचे माजी खेळाडू कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांचा देखील समावेश आहे. या दोघांनी देखील ६-६ वेळेस श्रीलंकेला आयसीसीच्या अंतिम फेरीत पोहोचवण्यात मोलाचं योगदान दिलं आहे.
सर्वाधिक वेळेस आयसीसी स्पर्धेतील अंतिम सामना खेळणारे भारतीय खेळाडू
सर्वाधिक वेळेस आयसीसीचा अंतिम सामना खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा समावेश आहे. दोघांकडे आयसीसीचे ९ अंतिम सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्यानंतर रविंद्र जडेजाचा नंबर लागतो. जडेजाकडे आयसीसीचे ८ अंतिम सामने खेळण्याचा अनुभव आहे. तर भारताचा माजी खेळाडू युवराज सिंगच्या नावे ७ वेळेस आयसीसीचा अंतिम सामना खेळण्याचा रेकॉर्ड आहे. आता या यादीत स्टिव्ह स्मिथने देखील प्रवेश केला आहे.
पहिल्या डावात दमदार अर्धशतक
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं आहे. ऑस्ट्रेलियाला या डावात हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. कगिसो रबाडाने सातव्या षटकात ऑस्ट्रेलियाला लागोपाठ २ मोठे धक्के दिले. उस्मान ख्वाजा शून्यावर माघारी परतला. तर मार्नस लाबुशेन १२, कॅमरून ग्रीन ४ आणि ट्रॅव्हिस हेड अवघ्या ११ धावांवर माघारी परतला. पण स्मिथ खंबीरपणे उभा राहिला. त्याने ७६ चेंडूंचा सामना करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.