अ‍ॅडलेड : स्कॉट बोलंड (३/१६), मायकल निसर (३/२२) आणि मिचेल स्टार्क (३/२९) या वेगवान त्रिकुटाच्या प्रभावी माऱ्याच्या बळावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पाहुण्या वेस्ट इंडिजचा ४१९ धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० असे निर्भेळ यश संपादन केले.

अ‍ॅडलेड ओव्हलवर झालेल्या प्रकाशझोतातील या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने विंडीजपुढे विजयासाठी ४९७ धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसअखेर विंडीजची ४ बाद ३८ अशी स्थिती होती. चौथ्या दिवशी विंडीजचा दुसरा डाव केवळ ७७ धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये विंडीजची ही दुसरी सर्वात नीचांकी धावसंख्या ठरली. विंडीजचा एकही फलंदाज २० धावांचा टप्पा ओलांडू शकला नाही.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने पहिला डाव ७ बाद ५११ धावांवर घोषित केला होता. ट्रॅव्हिस हेड (१७५) आणि मार्नस लबूशेन (१६३) यांनी शतके झळकावली होती. त्यानंतर विंडीजचा पहिला डाव २१४ धावांतच आटोपला होता .

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव ६ बाद १९९ धावांवर घोषित करत विंडीजपुढे ४९७ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. विंडीजला या धावसंख्येच्या जवळपासही पोहोचता आले नाही.