नवी मुंबई : महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत भारताच्या विजयात निर्णायक खेळी करणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्ज हिने अखेरपर्यंत दाखवलेली मानसिक कणखरता विलक्षण होती, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिलीने व्यक्त केली.
एकदिवसीय कारकीर्दीमधील तिसरी आणि विश्वचषकातील पहिली शतकी खेळी करताना जेमिमाने नाबाद १२७ धावा केल्या. तिच्या या कामगिरीने भारताला उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाच्या ३३८ धावांच्या विक्रमी आव्हानाचा पाठलाग करणे शक्य झाले.
‘‘सामना संपण्यास चार-पाच षटके शिल्लक असतानाही आम्ही धीर सोडला नव्हता. मात्र, प्रतिस्पर्ध्यांवर पुरेसे दडपण आणण्यात तुम्ही अपयशी ठरलात, तर यश तुमच्यापासून दुरावते आणि हेच आज आमच्याबाबतीत घडले. जेमिमाने ज्या मानसिकतेने फलंदाजी केली ती विलक्षण होती,’’ असे हिली म्हणाली.
कर्णधार हिली ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीबाबत कमालीची निराश होती. ‘‘आमची एकही खेळाडू विजयासाठी खेळत आहे असे वाटत नव्हते. अशा महत्त्वाच्या सामन्यात अशा क्षुल्लक चुका अपेक्षित नसतात. फलंदाजीतून निर्माण केलेल्या संधीचा फायदा घेण्यात आम्ही अपयशी ठरलो. आव्हानाचा पाठलाग करताना आमचा खेळ सामान्य होता. जेमिमाला दिलेली दोन जीवदाने आम्हाला महागात पडली,’’ असेही हिली म्हणाली.
‘‘जेमिमाचे दोन झेल आम्ही सोडले. मात्र, त्यामुळे तिच्या खेळीचे महत्त्व कमी होत नाही. तिने दाखवलेली मानसिक कणखरता सर्वोत्तमच होती. संघाला विजयापर्यंत नेण्यासाठी अखेरपर्यंत खेळपट्टीवर राहण्याचे तिचे नियोजन जबरदस्त होते,’’ अशा शब्दांत हिलीने जेमिमाच्या खेळीचे कौतुक केले.
‘‘जेमिमा आणि हरमनप्रीत यांच्यात झालेली १६७ धावांची भागीदारीही निर्णायक ठरली. फलंदाजीसाठी पोषक असलेल्या खेळपट्टीचा या दोघींनी चांगला फायदा घेतला. या जोडीवर अंकुश ठेवू शकलो नाही हे आमच्यासाठी सर्वांत निराशाजनक होते. संघाला जेव्हा गरज असते, तेव्हा हरमनप्रीत पुढे येऊन खेळते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले,’’ असे हिलीने सांगितले.
‘‘या वेळी महिला क्रिकेटला नवा विश्वविजेता मिळणार आहे. भारतीय संघाला चाहत्यांकडून किती पाठिंबा मिळतो हे या स्पर्धेत दिसून आले आहे. अंतिम सामना घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळणे, ही भारतीय संघासाठी महत्त्वाची बाब ठरू शकेल,’’ असेही हिली म्हणाली.
यंदाची विश्वचषक स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली यात शंका नाही. महिला क्रिकेटची प्रगती सुरू राखण्यासाठी आता अधिक एकदिवसीय सामने खेळले जाणे अपेक्षित आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर द्विदेशीय मालिकांची संख्या वाढायला हवी. – एलिसा हिली, ऑस्ट्रेलियाची कर्णधार
