दुखापतीमुळे सध्या संघाबाहेर असला, तरी मायकेल क्लार्कच्या नेतृत्वक्षमतेवर विश्वास प्रकट करून ऑस्ट्रेलियाने जगज्जेतेपदाची मोहीम आखली आहे. क्लार्कला तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी २१ फेब्रुवारीपर्यंत मुदत देऊन त्याचा ऑस्ट्रेलियाच्या १५ सदस्यीय विश्वचषकाच्या संघात समावेश करण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या यजमानपदाखाली होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पध्रेला १४ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. त्याआधी १६ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तिरंगी एकदिवसीय स्पध्रेत ऑस्ट्रेलियासह इंग्लंड आणि भारताचा समावेश आहे.
क्लार्क सध्या मांडीचा स्नायू आणि पाठीला झालेल्या दुखापतींशी झगडतो आहे. त्यामुळे तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण झाल्यास त्याला ऑस्ट्रेलियाच्या संघाचे नेतृत्व करता येईल.
‘‘क्लार्क दुखापतीतून सावरल्यास तो ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषकाच्या अभियानाचे नेतृत्व करेल. तो जगातील एक सर्वोत्तम फलंदाज असल्यामुळे त्याला आम्ही तंदुरुस्ती सिद्ध करण्याची योग्य संधी देत आहोत,’’ असे राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य रॉड मार्श यांनी सांगितले.
‘‘ऑस्ट्रेलियाचा विश्वचषकातील दुसरा सामना २१ फेब्रुवारीला बांगलादेशशी होणार आहे. तोवर मायकेल दुखापतीमधून सावरला नाही, तर त्याच्या जागी आम्ही अन्य खेळाडूचा संघात समावेश करू. याची क्लार्कला पूर्ण जाणीव असल्यामुळे तो वैद्यकीय कर्मचाऱ्यांसमवेत तंदुरुस्तीसाठी मेहनत घेत आहे,’’ असे मार्श यांनी सांगितले. क्लार्क अनुपलब्ध झाल्यास कोणत्या खेळाडूचा संघात समावेश केला जाईल, हे स्पष्ट करण्यात आले नाही. त्याच्या जागी नेतृत्वाची धुरा मात्र जॉर्ज बेलीकडे सोपवण्यात
येईल.
झेव्हियर डोहर्टीचा विशेषज्ञ फिरकी गोलंदाज म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ विक्रमी पाचव्यांदा विश्वचषक जिंकण्यासाठी उत्सुक आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानावर १४ फेब्रुवारीला ऑस्ट्रेलियाची सलामी इंग्लंडशी होणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ
मायकेल क्लार्क (कर्णधार), जॉर्ज बेली (उपकर्णधार), पॅट कमिन्स, झेव्हियर डोहर्टी, जेम्स फॉल्कनर, आरोन फिन्च, ब्रॅड हॅडिन, जोश हॅझलवूड, मिचेल जॉन्सन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसन.
विश्वचषक खेळण्याचा क्लार्कचा निर्धार
सिडनी : आगामी विश्वचषक क्रिकेट स्पध्रेसाठी कर्णधारपद सोपवण्यात आले असले तरी मायकेल क्लार्कला अजून तंदुरुस्तीच्या अग्निपरीक्षेतून तावूनसुलाखून जायचे आहे. परंतु या प्रतिष्ठेच्या स्पध्रेत खेळण्याचा निर्धार क्लार्कने प्रकट केला आहे.
‘‘मी विश्वचषक स्पध्रेत निश्चितपणे खेळेन. मी तोवर तंदुरुस्त होईन, याबाबत मला विश्वास आहे,’’ असे क्लार्कने सांगितले.
सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर असलेला क्लार्क म्हणाला, ‘‘पूर्णपणे तंदुरस्त होण्याकडे मी लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी जास्त कालावधी लागला तरी चालेल. बांगलादेशच्या तारखा मी समोर ठेवलेल्या नाहीत, तर मी माझ्या दैनंदिन सरावाकडे गांभीर्याने पाहतो.’’
अॅशेससाठी हॅरिस विश्वचषकातून बाहेर
सिडनी : ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज रायन हॅरिसला वर्षअखेरीस होणाऱ्या अॅशेस मालिकेचा विचार करून विश्वचषकाच्या संघात स्थान दिले नसल्याचे निवड समितीने स्पष्ट केले आहे. ३५ वर्षीय हॅरिसने अखेरचा एकदिवसीय सामना तीन वर्षांपूर्वी खेळला होता, त्यानंतर दुखापतीमुळे त्याला एकही एकदिवसीय सामना खेळता आला नाही.
‘‘कसोटी सामन्यांसाठी हॅरिस हा आमच्यासाठी फार महत्त्वाचा खेळाडू आहे. अॅशेससारख्या पारंपरिक कसोटी मालिकेमध्ये संघाला त्याची अधिक आहे,’’ असे निवड समितीचे अध्यक्ष रॉड मार्श यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jan 2015 रोजी प्रकाशित
क्लार्क ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषकाच्या संघात
दुखापतीमुळे सध्या संघाबाहेर असला, तरी मायकेल क्लार्कच्या नेतृत्वक्षमतेवर विश्वास प्रकट करून ऑस्ट्रेलियाने जगज्जेतेपदाची मोहीम आखली आहे.
First published on: 12-01-2015 at 01:04 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australia name michael clarke as world cup captain