इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ३०० धावा केल्या. त्यानंतर शिस्तबद्ध गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाची ९ बाद २४४ अशी अवस्था केली. मात्र यानंतर जेम्स फॉल्कनररूपी वादळाच्या तडाख्यात इंग्लंडचा संघ निष्प्रभ ठरला आणि ऑस्ट्रेलियाने ३ चेंडू आणि १ विकेट राखून थरारक विजय मिळवला.
विजयासाठी ३०० धावांचे लक्ष्य मिळालेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. आरोन फिंच भोपळाही फोडू शकला नाही. डेव्हिड वॉर्नर १८ धावा करून तंबूत परतला. कर्णधार मायकेल क्लार्कला जो रुटने १७ धावांवर बाद केले. नियमित अंतराने फलंदाज बाद होत असल्याने ऑस्ट्रेलियाची ५ बाद १२० अशी अवस्था झाली. यानंतर सहाव्या विकेटसाठी ग्लेन मॅक्सवेल आणि ब्रॅड हॅडिनने ८० धावांची भागीदारी केली. हॅडिनला बाद करत टीम ब्रेसननने ही जोडी फोडली. ग्लेन मॅक्सवेल ५४ धावांची खेळी करून माघारी परतला. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावाची घसरण होऊन ९ बाद २४४ अशी स्थिती झाली. या स्थितीत इंग्लंडच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी होती. मिचेल जॉन्सन बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाला ३६ चेंडूत ९.५०च्या सरासरीने ५७ धावांची आवश्यकता होती. अष्टपैलू खेळाडू जेम्स फॉल्कनरने क्लिंट मॅककेच्या साथीने हे आव्हान पेलले. काही दिवसांपूर्वी भारताविरुद्धच्या सामन्यात अशीच वादळी खेळी करणाऱ्या फॉल्कनरने या सामन्यातही चौकार आणि षटकारांची बरसात केली. या खेळीदरम्यान जो रुटने त्याचा झेल सोडला. हा झेल इंग्लंडला चांगलाच महागात पडला. प्रत्येक षटकागणिक कठीण होत जाणारे समीकरण लक्षात ठेवून तुफानी टोलेबाजी करत फॉल्कनरने ऑस्ट्रेलियाला सनसनाटी विजय मिळवून दिला.
शेवटच्या षटकातही ऑस्ट्रेलियाला ६ चेंडूंत १२ धावांची आवश्यकता होती, मात्र फॉल्कनरने पहिल्या तीन चेंडूवर तीन चौकार लगावत ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. फॉल्कनर-मॅकके जोडीने दहाव्या विकेटसाठी ५७ धावांची अभेद्य भागीदारी केली. फॉल्कनरने ४७ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ६९ धावांची खेळी करीत संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी इऑन मॉर्गनच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने ३०० धावांची मजल मारली. इयान बेलने ६८ धावा केल्या. मात्र मॉर्गनने शानदार शतकी खेळी करत इंग्लंडला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. त्याने ४ चौकार आणि ६ षटकारांच्या साह्य़ाने १०६ धावांची खेळी केली. जोस बटलरने ३६ चेंडूत ४९ धावा करत त्याला चांगली साथ दिली.
या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. वादळी खेळी करणाऱ्या फॉल्कनरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.