ऑस्ट्रेलिया-श्रीलंका क्रिकेट मालिका
डेव्हिड वॉर्नर (नाबाद ६०) आणि स्टीव्ह स्मिथ (नाबाद ५३) या माजी उपकर्णधार-कर्णधाराच्या जोडीने साकारलेल्या दिमाखदार अर्धशतकांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात श्रीलंकेचा नऊ गडी आणि ४२ चेंडू राखून धुव्वा उडवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.
ब्रिस्बेनला झालेल्या या सामन्यात फिरकीपटू अॅडम झम्पा आणि अॅश्टन अॅगर यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेचा डाव १९ षटकांत ११७ धावांतच गुंडाळला. बिली स्टॅनलेक आणि पॅट कमिन्स या वेगवान जोडीनेसुद्धा प्रत्येकी दोन गडी बाद केले. कुशल परेराने श्रीलंकेतर्फे सर्वाधिक २७ धावा केल्या.
प्रत्युत्तरात कर्णधार लसिथ मलिंगाने पहिल्याच षटकात आरोन फिंचला शून्यावर माघारी पाठवले. परंतु त्यानंतर वॉर्नर-स्मिथ यांच्या अनुभवी जोडीने कोणतेही आत्मघाती फटके न लगावता फक्त चौकारांच्या बळावर दुसऱ्या गडय़ासाठी ११७ धावांची अभेद्य भागीदारी रचून ऑस्ट्रेलियाचा विजय साकारला. गेल्या लढतीतील शतकवीर वॉर्नरने कारकीर्दीतील १४ वे अर्धशतक साकारताना नऊ चौकारांसह ६० धावा केल्या, तर स्मिथने सहा चौकारांसह ५३ धावा करतानाच कारकीर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले. मालिकेतील तिसरा सामना शुक्रवारी मेलबर्नला रंगणार आहे.
